ब्रेकिंग
खाकीच्या क्रूरतेचा ‘काळा अध्याय’ संपला! पोलीस ठाण्यातील हत्याकांडात ९ पोलिसांना फाशी; न्यायालयाने सुनावला ऐतिहासिक निकाल

0
6
1
9
8
1
मदुराई : देशाला हादरवून सोडणाऱ्या तामिळनाडूतील सथानकुलम ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणात मदुराई जिल्हा न्यायालयाने आज ऐतिहासिक आणि तितकाच कठोर निकाल दिला आहे. पोलीस कोठडीत पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांचा अमानुष छळ करून त्यांची हत्या करणाऱ्या ९ पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायालयाने फाशीची (मृत्युदंड) शिक्षा सुनावली आहे. वर्दीतील रक्षकांनीच भक्षकाची भूमिका बजावल्याने न्यायालयाने या प्रकरणाला रेयरेस्ट ऑफ रेअर’ (दुर्मिळात दुर्मिळ) श्रेणीत टाकले आहे.
२०२० मध्ये कोरोना लॉकडाऊन सुरू असताना, थुथुकुडी जिल्ह्यातील सथानकुलम येथे पी. जयराज (५८) आणि त्यांचा मुलगा बेनिक्स (३१) यांनी आपले मोबाईलचे दुकान निर्धारित वेळेपेक्षा काही मिनिटे जास्त उघडे ठेवले होते. केवळ याच शुल्लक कारणावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र, त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये जे घडले, ते माणुसकीला काळिमा फासणारे होते.

तपासादरम्यान सीबीआयने धक्कादायक खुलासे केले होते. ताब्यात घेतलेल्या पिता-पुत्रावर पोलिसांनी रात्रभर अमानुष लाठीचार्ज केला. त्यांच्या गुप्तांगांना गंभीर इजा पोहोचवण्यात आली. रक्ताने माखलेल्या अवस्थेतही त्यांना सोडण्यात आले नाही. या अमानुष छळामुळे २२ आणि २३ जून २०२० रोजी दोघांचाही मृत्यू झाला.
सीबीआयला तपासात पोलीस स्टेशनच्या भिंतीवर पीडितांच्या रक्ताचे डाग आढळले होते, जे पोलिसांच्या निर्दयीपणाचा सर्वात मोठा पुरावा ठरले.
न्यायालयाचे या घटनेत जोरदार प्रहार केला असून यांना “नुसती जन्मठेप पुरेशी नाही” असे म्हटले आहे.
न्यायाधीश मुथुकुमारन यांनी निकाल देताना अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले
“ज्यांच्यावर कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी होती, त्यांनीच निष्पाप नागरिकांची हत्या केली. हा गुन्हा सुशिक्षित अधिकाऱ्यांनी केला असल्याने तो अधिक गंभीर आहे.”
“केवळ जन्मठेप दिल्याने पोलीस विभागात जरब बसणार नाही. अशा घटनांना भविष्यात आळा घालण्यासाठी फाशीच योग्य आहे.”
“समाजाची सदसद्विवेकबुद्धी या घटनेने हादरली असून, हा निकाल त्या सामूहिक भावनेचे प्रतिबिंब आहे.”
न्यायालयाने मुख्य आरोपी तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीधर, सब-इन्स्पेक्टर बालकृष्णन आणि रघु गणेश यांच्यासह इतर ६ कॉन्स्टेबलना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच पीडित कुटुंबाला १.४० कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या प्रकरणातील सत्य दडपण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज हटवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र एका महिला कॉन्स्टेबलच्या धाडसी साक्षीने पोलिसांचा खरा चेहरा समोर आणला. ६ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर अखेर जयराज आणि बेनिक्स यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे.





