गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
फेसबुकवर स्वस्त गव्हाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला लुटणारी टोळी गजाआड; बारामती तालुका पोलिसांचा थरारक पाठलाग!

0
6
7
8
6
5
बारामती, ५ मे २०२६: फेसबुकवर बाजारभावापेक्षा स्वस्त दरात गहू देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला जाळ्यात ओढायचे आणि नंतर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बेदम मारहाण करत लुटायचे… अशा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दरोडा टाकणाऱ्या एका खतरनाक टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत थरारक पाठलाग करून पर्दाफाश केला आहे. पाच स्वतंत्र पोलिस पथकांचा अचूक समन्वय आणि सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी चार सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून ८,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्ह्याचा कट!
तासगाव (जि. सांगली) येथील गव्हाच्या पिठाचे व्यावसायिक सुरज सरजेराव गावडे (वय २७) यांनी फेसबुक मार्केटप्लेसवर “बाजारभावापेक्षा स्वस्त गहू” अशी जाहिरात पाहिली होती. त्यांनी जाहिरातीखालील लिंकवर आपली माहिती भरली. यानंतर आरोपींनी बनावट फेसबुक अकाउंटवरून गावडे यांना ऑडिओ कॉल करून संपर्क साधला आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी बारामती येथे बोलावले.
४ मे २०२६ रोजी सुरज गावडे हे आपल्या छोटा हत्ती टेम्पो आणि चालकासह बारामतीत आले. आरोपींनी त्यांना सतत फोन करून जागा बदलण्यास सांगितले. सुरुवातीला पेन्सिल चौक आणि नंतर कल्याणी कॉर्नर येथे बोलावले. कल्याणी कॉर्नर येथे नंबर प्लेट नसलेल्या आणि तोंड बांधलेल्या एका स्कूटी चालकाने, “शेठने पाठवले आहे,” असे सांगत गावडे व त्यांच्या चालकाला गहू दाखवण्याच्या बहाण्याने पियाजिओ कंपनीच्या पाठीमागे, पुलाचे काम सुरू असलेल्या निर्जन भागात नेले.
कपाळाला पिस्तूल आणि बेदम मारहाण
त्या निर्जन ठिकाणी आधीच चारचाकी वेरना कार घेऊन थांबलेल्या इतर आरोपींनी गावडे यांच्यावर हल्ला केला. एका उंच इसमाने थेट सुरज गावडे यांच्या कपाळावर पिस्तूल रोखली, तर दुसऱ्याने चालकाच्या डोक्यावर बंदूक ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली. दोघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याजवळील:
* २५,५०० रुपये रोख
* चांदीच्या दोन अंगठ्या व घड्याळ
* चालकाच्या कानातील सोन्याची बाळी (कटरने कापून घेतली)
असा एकूण सुमारे ५१,५०० रुपयांचा मुद्देमाल ओरबाडून आरोपी तेथून फरार झाले. “पोलिसांना सांगितले तर जीवे मारू,” अशी धमकीही त्यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तात्काळ संध्याकाळी ५.२५ वाजता तपासासाठी रवाना झाले. पोलिसांनी संशयित गुन्हेगारांचे फोटो फिर्यादीला दाखवले असता, एका आरोपीची ओळख पटली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली.
आरोपी अत्यंत सराईत असल्याने ते पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी सातत्याने रस्ते आणि लोकेशन बदलत होते. सायबर पोलिसांच्या मदतीने ट्रॅक केले असता आरोपींची वेरना कार खालील मार्गांवरून फिरत असल्याचे समोर आले:
उंडवडी – पाटस टोल नाका – शिर्सुफळ – गाडीखेल – पारवडी – खडकी – रावणगाव – कुरकुंभ – भिगवण – निरगुडे – लाकडी – कळस – डाळज – भाडलवाडी
थरारक चेस आणि सिनेमॅटिक अटक!
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ इंदापूर, भिगवण आणि वालचंदनगर पोलिसांना अलर्ट करून संपूर्ण परिसरात नाकाबंदी लावली. एका ठिकाणी पोलिसांनी आरोपींची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना पाहताच आरोपींनी गाडीचा वेग प्रचंड वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
शेवटी, सिनारमास कंपनीजवळ समोरून भिगवण पोलीस आणि मागून वालचंदनगर व बारामती पोलिसांनी घेराव घालत पाठलाग तीव्र केला. अखेर रात्री सुमारे ८.५० वाजता तीन आरोपींना गाडीसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौथा आरोपी अतुल भोलणकर याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी
१. रवी संजय माने (रा. वंजारवाडी, बारामती)
२. श्रीकांत अर्जुन घुले (रा. ढेकळवाडी, बारामती)
३. अभिषेक भाऊसो ठोंबरे (रा. ढेकळवाडी, बारामती)
४. अतुल मोहन भोलणकर (रा. वंजारवाडी, बारामती)




