Breaking
अभिव्यक्तीकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आता सोपी नाही! केवळ उसाचा भाव नाही, तर प्रस्थापित व्यवस्थाच बदलण्याचा सभासदांचा मनसुबा

0 8 5 9 4 5

सोमेश्वरनगर: सहकार क्षेत्रातील बारामती,इंदापूर व दौड तालुक्यातील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या ‘सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या’ आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. आजवर या कारखान्यावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व राहिले. मात्र, आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. ही निवडणूक प्रस्थापित सत्ताधाऱ्यांसाठी अजिबात सोपी आणि साधी राहिलेली नसून, त्यांना यावेळेस एका अभूतपूर्व आणि कडव्या संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.

प्रस्थापित सत्ताधाऱ्यांकडून ‘उसाला चांगला भाव दिला’ हा एकमेव निकष लावून जर निवडणूक सोपी जाईल अशी आशा बाळगली जात असेल, तर ती मोठी चूक ठरू शकते. कारण, उसाला चांगला भाव देणे हे आजचे विरोधक किंवा सत्तेवर येण्यासाठी उत्सुक असणारे इतर पक्षही सहज करू शकतात. खरा मुद्दा आता उसाच्या दराचा राहिला नसून, कारखान्यावरील प्रस्थापित व्यवस्था आणि गेली अनेक वर्षे ठाण मांडून बसलेली लोकं बदलण्याचा पक्का मनसुबा आता सभासदांनी केल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

सध्या प्रस्थापितांच्या विरोधात केवळ उसाच्या भावावरून त्रागा किंवा रोष नाही, तर कारखाना व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारापासून ते इतर अनेक गोष्टींपर्यंत प्रचंड नाराजी आहे. हा रोष केवळ सभासदांपुरताच मर्यादित नाही, तर कारखान्यावर आणि सभासदांवर अवलंबून असणाऱ्या इतर अनेक घटकांमध्येही तीव्र संताप खदखदत आहे. सत्तेच्या सावलीत ज्यांनी आजपर्यंत स्वतःच्या पोळ्या भाजून घेतल्या, त्यांच्याबद्दलची ही चीड आता उघडपणे बाहेर येत असून, येणाऱ्या काळात याचे गंभीर परिणाम निवडणुकीच्या रिंगणात नक्कीच पाहायला मिळतील.

आजवर कारखान्याच्या राजकारणात अजितदादांचा शब्द अंतिम असायचा. ‘आपला नेता येईल आणि सर्व काही सुरळीत करेल’ या विश्वासावर सत्ताधारी निर्धास्त असायचे. मात्र, त्यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने प्रस्थापितांचा तो मोठा आधार आता राहिलेला नाही. कारखान्याचे एक माजी अध्यक्ष यांनी “चुकीचे लोक तिथे नकोत” अशी स्पष्ट भूमिका मांडत कारखान्याच्या भविष्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

अलीकडेच पार पडलेल्या बारामती विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहानुभूतीची लाट संपुर्ण महाराष्ट्राने पहायली आहे त्यातून नको असलेली लोकं पण कुठेतरी त्या त्या सत्तेवर पहायला मिळत आहेत.या राजकीय बदलाचे थेट पडसाद आता सोमेश्वरमध्ये उमटत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गावोगावी मोर्चेबांधणी करत सभासदांशी थेट संवाद साधत आहे. तर दुसरीकडे शिवसेना (उबाठा) गटानेही आपले दंड थोपटले आहेत.

वर्षानुवर्षांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सभासदांना आता अनेक भक्कम पर्याय उपलब्ध झाले आहेत. एकंदरीतच, सोमेश्वर कारखान्याची आगामी निवडणूक ही केवळ सहकारातील एक निवडणूक नसून ती प्रस्थापित व्यवस्था उलथवून टाकण्याची लढाई ठरणार आहे. कारखान्याशी जोडला गेलेला प्रत्येक घटक आपला रोष मतदानातून कसा व्यक्त करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रस्थापितांना या निवडणुकीत अक्षरशः घाम फुटणार हे आता निश्चित झाले आहे.

अशाच परखड बातम्या येणाऱ्या काळात वाचायला मिळतील…….
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे