Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती शहर पोलिसांची दमदार कारवाई: ७२५ दिवस (सुमारे दोन वर्ष) फरार खून प्रकरणातील हवा असलेला आरोपी गजाआड; सोबत न्यायालयीन वॉरंटवरील आणखी एक आरोपी जेरबंद

0 8 4 3 6 8

बारामती: बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत दोन वर्षांपूर्वी घडलेल्या गंभीर व बहुचर्चित खून प्रकरणातील हवा असलेला आरोपी अनिकेत संजय पवार (वय २० वर्षे, रा. जगतापमळा, खंडोबानगर, बारामती, जि. पुणे) याला तब्बल ७२५ दिवसांच्या सुमारे दोन वर्षाच्या प्रदीर्घ शोध मोहिमेनंतर अटक करण्यात बारामती शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. 

यासोबतच याच खटल्यात जामिनावर सुटल्यानंतर न्यायालयाच्या कामकाजाला सातत्याने गैरहजर राहणाऱ्या भोल्या उर्फ किशोर बापू भिसे या आरोपीविरुद्ध जारी झालेले अटक वॉरंट बजावून त्यासही ताब्यात घेण्यात आले असून, न्यायालयाने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

या गंभीर गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की, सन २०२३ मध्ये टी.सी. कॉलेज परिसरात जयेश बाबासाहेब माने व त्याच्या साथीदारांशी फिर्यादी नवनाथ उत्तम चोरमले (वय ३९ वर्षे, व्यवसाय फोटोग्राफर, रा. अहिल्यादेवी चौक, जळोची, बारामती) यांचा भाचा गणेश धुळाबापू वाघमोडे (वय १७ वर्षे, रा. जळोची, बारामती) याचे भांडण झाले होते. या जुन्या वादाचा राग मनात धरून दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी गणेश हा मित्रांसोबत कपडे खरेदी करून जळोचीकडे परत जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपींनी त्याचा पाठलाग केला. जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ गणेशला अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने भीषण हल्ला करण्यात आला. नातेवाईक व मित्रांनी शोध घेतला असता गणेश ओढ्याजवळील शेतात रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला होता. त्याच्या डोके, मान व शरीरावर गंभीर वार झाले होते. या घटनेप्रकरणी दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

तपासादरम्यान जयेश बाबासाहेब माने, शुभम प्रवीण गायकवाड, करण हनुमंत जाधव, आतिश संतोष गुरळकर, सोमनाथ रंगनाथ यादव, भोल्या उर्फ किशोर बापू भिसे, बंडू भिवा काळे उर्फ बी.के. व इतर साथीदारांची भूमिका निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. गुन्ह्यात वापरलेली धारदार हत्यारे व वाहने जप्त करून न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले होते. मात्र, घटनेनंतर आरोपींना चारचाकी वाहनातून बाहेरगावी पळून जाण्यास मदत करणारा अनिकेत संजय पवार हा गुन्हा दाखल झाल्यापासून (२२ ऑगस्ट २०२४) पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता.

सदर घटनेतील हवा असलेला आरोपी याचा शोध सुरू असताना बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी अनिकेत पवार हा माळावरची देवी जवळील जवाहर पार्क परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ जवाहर पार्क परिसरात गोपनीय सापळा रचला. आरोपी तेथे पोहोचताच पोलिसांची चाहूल लागून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र सतर्क पोलिसांनी झडप घालून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.५५ वाजता त्यास रीतसर अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातील चारचाकी वाहनाबाबतही तपास व जप्तीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

याच गुन्ह्यातील आरोपी भोल्या उर्फ किशोर बापू भिसे हा जामिनावर मुक्त झाल्यानंतर न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. पोलीस हवालदार उदय टापरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यासही बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेऊन वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली आणि त्यासही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल व अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या सूचनेनुसार सन २००० पासूनच्या जुन्या गुन्ह्यांतील फरार, हवे असलेले आणि न्यायालयीन प्रक्रियेला टाळणाऱ्या आरोपींविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. 

बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या गुन्ह्यांचा नियमित आढावा घेऊन अशा आरोपींची माहिती अद्ययावत केली जात आहे. 

गुन्हा कितीही जुना असला किंवा आरोपी कितीही काळ पसार राहिला तरी कायद्याच्या कचाट्यातून त्याची सुटका होणार नाही, हा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.

सदर धडक कामगिरी मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस हवालदार यशवंत पवार, ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, गिरीश नेवसे, सागर जामदार, विशाल शिंदे तसेच वॉरंट बजावणारे पोलीस हवालदार उदय टापरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. पोलिसांच्या या तत्पर व सातत्यपूर्ण कामगिरीचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे