Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मानवी आरोग्याशी खेळ! केंदूरमध्ये छापा टाकून अवैध पावडर जप्त; शिक्रापूर पोलिसांकडून एकाला बेड्या

खाण्याच्या पानातून दिली जाणारी अपायकारक पावडर जप्त; एकाला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी

0 7 7 7 6 7

शिक्रापूर, दि. ११: मानवी आरोग्याशी खेळ करणाऱ्या अवैध व्यवसायाविरोधात शिक्रापूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. मौजे केंदूर येथील पहाडमळा परिसरात छापा टाकून पोलिसांनी पानामध्ये मिसळून विक्रीसाठी ठेवली जाणारी एक संशयित आणि उग्र वासाची अपायकारक पावडर जप्त केली आहे. या कारवाईत एका तरुणाला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यादव यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक कारंडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने दोन पंच, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सायंकाळी केंदूर येथील पहाडमळा परिसरात छापा टाकला. या कारवाईत तुषार राहुल पहाड (वय २६, रा. पहाडमळा, केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या घरामागील पत्राशेडची झडती घेण्यात आली.

या झडतीदरम्यान एका लाल रंगाच्या टेबलावरील बॉक्समध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ही उग्र वासाची पावडर आढळून आली. ही पावडर लोकांना व्यसनासाठी पानातून मिसळून दिली जात होती. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळीच या पावडरची प्राथमिक तपासणी केली. पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेल्या या पावडरमधून रासायनिक विश्लेषणासाठी १० ग्रॅमचे दोन नमुने स्वतंत्रपणे सीलबंद करण्यात आले, तर उर्वरित ८५ ग्रॅम पावडर नियमानुसार सील करून ताब्यात घेण्यात आली आहे.

याप्रकरणी आरोपी तुषार राहुल पहाड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात आली. आरोपीला शिरूर येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून, शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे, सोमनाथ कचरे, पोलीस अंमलदार धनंजय थेऊरकर आणि विशाल देशमुख यांच्या पथकाने केली.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, खाण्याच्या पानातून व्यसन लावणारे आणि मानवी आरोग्याशी खेळ करणारे असे अवैध प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना त्याची माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल आणि अशा अवैध प्रकारांवर तातडीने धडक कारवाई केली जाईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे