आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय; महाराष्ट्रातील ४.२८ लाख उमेदवारांची परीक्षा पुढे ढकलली

0
7
4
7
6
7
बारामती | पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE), पुणे यांच्या वतीने रविवार, २८ जून २०२६ रोजी राज्यभर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न बाहेर आल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, NEET-2026 परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन टीईटी परीक्षेसाठी सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र २७ जून रोजी पहाटे प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला. तपासादरम्यान परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जप्त करण्यात आलेल्या साहित्याची पडताळणी केली असता, त्यातील काही प्रश्न टीईटीच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.

या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी २८ जूनची टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.
राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. यासाठी सुमारे ४ लाख २८ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा पुढे ढकलल्याने हजारो उमेदवारांचा नियोजित प्रवास, निवास आणि तयारीवर परिणाम झाला आहे.




