Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

१२ तासांत हत्येचे गूढ उकलले: कोंढापुरी खून प्रकरणात शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई, श्रीरामपूरमधून आरोपीला अटक

0 9 8 7 6 2

कोंढापुरी (ता. शिरूर) : येथे एका तरुणाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गजाआड केले आहे. मित्रांसोबत फिरण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणात एकाला श्रीरामपूर येथून अटक करण्यात आली आहे, तर दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बुधवारी (दि. २१) सकाळी सातच्या सुमारास कोंढापुरी हद्दीत खंडोबा मंदिरासमोरील तलावाच्या कडेला एका अनोळखी तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तातडीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनीही घटनास्थळी भेट दिली. मृतदेहावर धारदार शस्त्राने अनेक वार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी वेगाने तपास करत दोन पथके रवाना केली आणि मृताची ओळख पटवली. महेंद्र लव सकट (वय २४, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे रांजणगाव परिसरातील तिघांचा यात सहभाग असल्याचा संशय आला. हे संशयित अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाव घेतली. बेलापूर बायपास परिसरातून पोलिसांनी प्रथमेश नानासाहेब राऊत (रा. फंडवस्ती, रांजणगाव गणपती, मूळ रा. ढोकसांगवी, ता. शिरूर) याला अटक केली, तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत हत्येचे धक्कादायक कारण समोर आले आहे. मृत तरुण आणि अल्पवयीन मुले एकमेकांच्या ओळखीचे होते. कोणासोबत फिरायचे आणि कोणाशी बोलायचे यावरून त्यांच्यात वाद होता. याच वादातून महेंद्र याला गांजा पिण्याचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तिथे दोन चाकूंनी त्याच्यावर १८ ते २० वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक हनमंतराव गिरी, राहुल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिग्नेश कोळी, अंकुश कारंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन सुद्रिक, राहुल गडदे, अमोल दांडगे, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, विश्वभर वाघमारे, अमोल चव्हाण, राम जाधव, नारायण वाळके आणि मच्छिंद निचीत यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे