अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
माळेगाव पोलीस स्टेशनतर्फे २६/११ शहीद दिन आणि संविधान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; १९५ जणांचे उत्स्फूर्त रक्तदान

1
0
3
1
3
0

माळेगाव : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून माळेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या रुग्णालयांमध्ये जाणवणारा रक्ताचा तुटवडा आणि गरजू रुग्णांची सामाजिक गरज लक्षात घेऊन आयोजित केलेल्या या शिबिराला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण १९५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

माळेगाव पोलीस स्टेशनच्या प्रांगणात सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हे शिबिर पार पडले. या सामाजिक उपक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह माळेगाव, जळगाव कप, पणदरे, सांगवी व परिसरातील प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, विविध विभागांचे कर्मचारी, युवक मंडळे, सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

यावेळी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत रक्तदान करणाऱ्या नागरिकांना रस्ता सुरक्षेचा संदेश देत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. तसेच, या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सॅक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रक्तदानातून गरजू रुग्णांना नवजीवन देण्याचा हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल माळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी सर्व रक्तदाते आणि उपस्थितांचे आभार मानले.




