Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

दारूच्या नशेत भरधाव दुचाकी चालविणाऱ्याला बारामती न्यायालयाकडून १० हजार ५०० रुपयांचा दंड; बारामती शहर पोलिसांच्या पाठपुराव्याला यश

0 8 4 4 2 4

बारामती: दारूच्या नशेत भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या एका चालकास बारामती न्यायालयाने दोषी ठरवत एकूण १०,५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास साध्या कैदेची तरतूदही न्यायालयाने आदेशात नमूद केली आहे. बारामती शहर पोलिसांनी सादर केलेले भक्कम पुरावे आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्यामुळे ही शिक्षा सुनावण्यात आली.

बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. ६५३/२०२३ नुसार, आरोपी सुनील हिरा सरक (वय ४८ वर्षे, रा. डोंबाळवाडी, ता. फलटण, जि. सातारा) हा त्याच्या ताब्यातील टीव्हीएस स्टार सिटी मोटारसायकल (क्र. MH-11-BG-3193) दारूच्या अंमलाखाली, वेडीवाकडी, हयगयीने आणि रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, तो दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी भा.दं.वि. कलम २७९ आणि मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मा. टी. डी. इंगवले यांच्या न्यायालयात पार पडली. उपलब्ध पुरावे आणि वैद्यकीय कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली,

  • भा.दं.वि. कलम २७९: ५०० रुपये दंड (दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद).

  • मोटार वाहन कायदा कलम १८५: १०,००० रुपये दंड (दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद).

हे प्रकरण न्यायालयात सिद्ध करण्यासाठी महिला पोलीस कॉन्स्टेबल सगुना आवटे यांनी साक्षीदारांशी समन्वय साधून विशेष परिश्रम घेतले. सरकारी वकील ॲड. रणसिंग यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. तपास व न्यायालयीन प्रक्रियेत सहाय्यक फौजदार एस. डी. काळे, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी स.पो.नि. माधुरी तावरे, कोर्ट पैरवी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जी. के. कस्पटे व सहाय्यक फौजदार ए. जे. कवडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ही सर्व कामगिरी बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली.

बारामती पोलिसांचे नागरिकांना आवाहन: मद्यप्राशन करून अथवा निष्काळजीपणे वाहन चालवणे ही स्वतःसह निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणारी बाब आहे. अशा प्रकारांवर पोलीस प्रशासनाकडून यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे