गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत शहर पोलिसांची विशेष मोहीम, माळेगाव खुनाच्या प्रयत्नातील आरोपींच्या शोधासाठी आमराई परिसरात रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन.

0
9
2
8
6
3
बारामती : माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यासाठी आणि शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी आमराई परिसरात मोठी कोम्बिंग मोहीम राबवली. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, घातक शस्त्रे आणि संशयित वाहनांवर विशेष नजर ठेवण्यात आली.
माळेगाव बुद्रुक येथील तावरे पेट्रोल पंप परिसरात २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका जुन्या भांडणाचा राग मनात धरून काही तरुणांवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात संदीप जगताप, अनिकेत धुमाळ आणि पृथ्वीराज निंबाळकर हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी गणेश भोसले, शुभम मोरे, मयूर शितोळे, प्रेम कांबळे, हर्षद रणधीर, भुमेश झेंडे व इतर ६ ते ७ जणांवर माळेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील मुख्य आरोपी प्रेम कांबळे, शुभम मोरे आणि गणेश भोसले यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आमराई परिसरातील संभाव्य वास्तव्यस्थळे आणि संपर्कस्थळांची रात्रभर झाडाझडती घेतली. या कारवाईत परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा ओमासे, पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले यांच्यासह ६ पोलीस अधिकारी आणि सुमारे ५० पोलीस अंमलदारांचा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता. पोलिसांनी परिसरातील सराईत गुन्हेगारांच्या सध्याच्या हालचाली आणि त्यांच्या वास्तव्याचीही कसून तपासणी केली.
या ठिकाणी अग्निशस्त्रे, कोयते, तलवारी किंवा अन्य बेकायदेशीर जीवघेणी हत्यारे साठवली अथवा बाळगली जात आहेत काय, फरार आरोपींना आश्रय दिला जात आहे काय आणि गुन्हेगारी कृत्यास मदत करणारी साधनसामग्री उपलब्ध आहे काय, याची कायदेशीर चौकटीत पडताळणी करण्यात आली.
तसेच आमराई भागात नंबरप्लेट नसलेली, संशयास्पदरीत्या उभी असलेली आणि वाहनचोरीच्या अनुषंगाने पडताळणी आवश्यक असलेली वाहने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली. संबंधित वाहनांची कागदपत्रे, इंजिन नंबर, चेसिस नंबर आणि पोलीस अभिलेख तपासण्यात येत असून, चोरीचे वाहन आढळल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध स्वतंत्र कायदेशीर कारवाई करून वाहन मूळ मालकास परत देण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
बारामती शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, गंभीर गुन्हा करून फरार होणे, शस्त्रांच्या जोरावर दहशत निर्माण करणे, आरोपींना आश्रय देणे किंवा गुन्हेगारी कृत्यास मदत करणे याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जाईल. प्रत्येक कारवाई पुरावे, कायदेशीर प्रक्रिया आणि लागू तरतुदींच्या आधारेच केली जाईल.



