Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सासवडमध्ये जमिनीच्या वादातून थरार; एक कोटीच्या खंडणीसाठी थेट डोक्याला लावले पिस्तुल, कोयत्याने जीवघेणा हल्ला

0 7 8 6 8 7

सासवड : पुणे जिल्ह्यातील सासवड येथे भरदिवसा एका कार्यालयात घुसून जमिनीच्या वादातून टोळीने सशस्त्र दहशत माजवल्याची थरारक घटना घडली आहे. एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फिर्यादीच्या डोक्याला थेट पिस्तुल लावून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, तर दुसऱ्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. मात्र, सुदैवाने फिर्यादीने वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सविस्तर माहितीनुसार, सासवड हद्दीतील बाळासाहेब भिंताडे यांच्या श्रीगणेश ऑफिसमध्ये फिर्यादी सतीश शंकर गायकवाड हे त्यांचे पार्टनर व इतर सहकाऱ्यांसोबत बसले होते. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अभिषेक बोरकर आणि त्याचे इतर सहा साथीदार तिथे आले. त्यांनी एका जमिनीच्या खरेदीवरून वाद उकरून काढला. जर त्या जागेत यायचे असेल तर आम्हाला एक कोटी रुपये द्यावे लागतील, अशी खंडणी त्यांनी मागितली. त्यानंतर अभिषेक बोरकर याने हातातील बंदूक टेबलाच्या काचेवर आपटून दहशत माजवली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या वेदांत कटके याने सतीश गायकवाड यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला, मात्र ते वेळीच मागे सरकल्याने थोडक्यात बचावले. दरम्यान, नानजी बडदे याने गायकवाड यांच्या डोक्याला पिस्तुल लावत आज इथेच संपवून टाकतो, अशी धमकी दिली.

या सर्व प्रकारानंतर आरोपींनी कार्यालयाची मोठी तोडफोड केली. कार्यालयाबाहेर येऊन त्यांनी कोयते आणि लाकडी दांडके हवेत फिरवून दहशत निर्माण केली. या थरारामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी घाबरून आपली दुकाने बंद केली आणि लोकांची पळापळ सुरू झाली. फिर्यादीने तिथून कशीबशी सुटका करून घेत थेट सासवड पोलीस स्टेशन गाठले. आरोपी त्यांच्या काळ्या रंगाच्या थार आणि आय २० गाडीतून पळून गेले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवली. सासवड पोलिसांनी तातडीने तीन पथके तयार करून पळून गेलेल्या आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. बोपदेव घाटाच्या दिशेने पळालेल्या आरोपींना हिवरे आणि त्यानंतर कोडीत गावाच्या परिसरात पोलिसांनी गाठले. पोलिसांची चाहूल लागताच उसाच्या शेतातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

यामध्ये वेदांत कटके, निखिल कामठे, शुभम बडदे आणि ज्ञानेश म्हेत्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन वाहने जप्त केली आहेत. इतर आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.
पोलिसांनी तातडीने धाव घेतल्यामुळे आरोपींचा गोळीबार करण्याचा मनसुबा उधळला गेला. पकडण्यात आलेल्या आणि पळून गेलेल्या अनेक आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, अशा सराईत गुन्हेगारांवर यापुढे अधिक कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे