Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

माळेगावात राजकारणाच्या रागातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; एकासह दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल

0 8 2 7 6 2

बारामती : तालुक्यातील माळेगाव येथे राजकीय द्वेष आणि जुन्या साक्षीच्या रागातून एका ५२ वर्षीय शेतकऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह दोन अज्ञात व्यक्तींवर विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन वसंतराव तावरे (वय ५२, रा. शिवनगर, माळेगाव, ता. बारामती) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:५० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नितीन तावरे हे केस कापून आपल्या दुचाकीवरून शिवनगर येथील घराकडे परतत होते. त्यावेळी माळेगाव-शिरवली रस्त्यावरील दफनभूमीजवळ आरोपी अजिंक्य ऊर्फ पप्पू सुरेश भोसले (रा. माळेगाव बुद्रुक) याने त्याच्या दुचाकीवर दोन अनोळखी इसमांना बसवून आणले आणि तावरे यांच्या दुचाकीला जाणीवपूर्वक धडक दिली.
तावरे खाली पडल्यानंतर आरोपींनी त्यांना, “तू आमच्या विरोधात साक्ष देतो काय, गावामध्ये राजकारणात खूप पुढे पुढे करतोस, आता तुला आम्ही जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली. यानंतर अजिंक्य भोसले याने जीवे मारण्याच्या उद्देशाने आणलेल्या लोखंडी रॉडने तावरे यांच्या छातीच्या उजव्या बाजूला जोरदार प्रहार केला. तसेच आरोपी आणि त्याच्यासोबतच्या दोन अज्ञात साथीदारांनी तावरे यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व गंभीर दुखापत केली.
या हल्ल्यात जखमी झालेल्या नितीन तावरे यांच्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून माळेगाव पोलीस ठाण्यात अजिंक्य ऊर्फ पप्पू सुरेश भोसले आणि इतर दोन अज्ञातांविरुद्ध बीएनएस कलम १०९(१), ११५(२), १२६(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा नोंद क्रमांक १९९/२०२६ अन्वये दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक संजय मोहिते यांनी या गुन्ह्याची नोंद केली असून, माळेगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुलदीप संपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक देविदास साळवे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे माळेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे