Breaking
अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

“शिक्षकांचे ओरडणे मारणे हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि भल्यासाठीच असते,”  सहायक पोलिस निरीक्षक श्री.शिवाजी जायपत्रे 

जिद्द आणि चिकाटी असल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही बनू शकतात मोठे अधिकारी,लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांचे प्रतिपादन 

0 8 9 3 6 4

वडगाव निंबाळकर : कोणत्याही मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी केवळ शहरातील मोठ्या शाळेत किंवा इंग्रजी माध्यमात शिकण्याची गरज नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आणि चिकाटी असेल, तर ते देखील मोठे अधिकारी नक्कीच बनू शकतात, असा प्रेरणादायी कानमंत्र लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी जायपत्रे यांनी विद्यार्थ्यांना दिला. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उमाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने वडगांव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर येथे आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जायपत्रे साहेब आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींत रमलेले पाहायला मिळाले. तब्बल वीस वर्षांनंतर ज्या शाळेत आपण पाचवी ते दहावीचे शिक्षण घेतले, त्याच शाळेच्या प्रांगणातील लिंबाच्या झाडाखाली उभे राहताना त्यांना अतिशय आनंद झाला. 

शालेय जीवनातील शिक्षकांची कडक शिस्त आणि त्यांच्याबद्दलचा आदर यावर बोलताना ते म्हणाले की, त्या काळात शिक्षकांचा एक वेगळाच दरारा असायचा. शाळा सोडून पळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गिरमे सर असा काही छडीचा प्रसाद द्यायचे की पाठीवर आणि मांडीवर पडलेली काळी वळ पंधरा-पंधरा दिवस जात नसे. गुंटे सरांच्या छडीला असलेल्या घुंगराच्या आवाजानेच दोन वर्ग अलीकडे असताना संपूर्ण वर्ग शांत व्हायचा, तर गणिताच्या मॅडम डस्टरने मारायच्या. पण याच कडक शिस्तीमुळे आमची पिढी घडली आणि विषय पक्के झाले, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

शिक्षकांचा मार खाऊनही त्याकाळी विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल प्रचंड आदर आणि जिव्हाळा होता. शाळेतील विज्ञान आणि भूगोलाच्या चार शिक्षकांची जेजुरीला बदली झाली, तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरील प्रेमापोटी तब्बल चार दिवस शाळा बंद पाडून आंदोलन केले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.

मात्र, आजच्या बदललेल्या परिस्थितीवर त्यांनी स्पष्ट शब्दांत खंत व्यक्त केली. 

आज शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ओरडल्यास किंवा मारल्यास पालक लगेच शाळेत जाब विचारायला येतात. शिक्षकांचे ओरडणे हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी असते, कोणताही शिक्षक वैयक्तिक रागातून ओरडत नाही, हे आजच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे, असे ते म्हणाले.

आपल्या यशाचे गमक सांगताना त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. अभ्यासातील सातत्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत ते म्हणाले की, दहावीपर्यंत पहिल्या बाकावर बसणारे आणि चांगले गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी नंतरच्या आयुष्यात मागे पडलेले दिसतात. याउलट, ज्यांनी स्वतःमध्ये बदल घडवला आणि सातत्य राखले, असे बॅक बेंचर्स आज मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. याच शाळेत शिकलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके साहेब, आणि मी स्वतः व आमच्या सारखे अनेक विद्यार्थी या शाळेने घडविले आहेत यातीलच आम्ही जिवंत उदाहरणे आहोत.

ग्रामीण भागातील मुलांच्या मनात असलेल्या इंग्रजी भाषेच्या भीतीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, स्वतःलाही सुरुवातीला ही भीती वाटायची, पण मनातील हा न्यूनगंड सर्वांनी काढून टाकणे गरजेचे आहे. मोठे अधिकारी होण्यासाठी इंग्रजी माध्यमाचीच गरज नसून केवळ मेहनतीची आणि जिद्दीची तयारी हवी.

शेवटी,वीस वर्षांनंतर शाळेने बोलावून जो सन्मान केला, त्याबद्दल श्री. जायपत्रे यांनी प्रतिष्ठान आणि स्वातंत्र्य विद्या मंदिराचे विशेष आभार मानले. तसेच, भविष्यात शाळेच्या कोणत्याही कामासाठी आपण नेहमी तत्पर असू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे