बारामती : बारामती शहर पोलिसांनी केवळ आजचीच कारवाई नव्हे, तर जानेवारी २०२६ पासून गोवंश संरक्षणासाठी एक सातत्यपूर्ण आणि धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तब्बल ४१ गोवंश जनावरे बेकायदेशीर वाहतुकीतून मुक्त करून त्यांना विविध गोशाळांमध्ये सुरक्षितरित्या दाखल करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचले असून, गोवंश हत्येला आळा घालण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ (Zero Tolerance Policy) धोरण स्वीकारले आहे.
याच सातत्यपूर्ण मोहिमेचा एक भाग म्हणून, शनिवार, दिनांक ०६ जून २०२६ रोजी गुणवडी रोड परिसरात पोलिसांनी दोन मालवाहू वाहनांवर कारवाई करत चार गोवंश जनावरांची सुटका केली आहे.

गुणवडी रोड परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची संशयास्पद व बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, बारामती शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्याने तात्काळ सापळा रचून संयुक्त कारवाई केली.
या कारवाईदरम्यान, महिंद्रा वीरो (MH45AX0859) या वाहनामध्ये एक पांढऱ्या रंगाची खिल्लार गाय आणि महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप (MH12VF1033) मध्ये एक पांढऱ्या-काळ्या रंगाची जर्सी गाय, एक काळ्या रंगाची जर्सी गाय व एक कालवड असे एकूण चार गोवंश मिळून आले. प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले की, या जनावरांची वाहतूक अत्यंत अमानुष, निर्दयीपणे आणि दाटीवाटीने केली जात होती. जनावरांसाठी चारा, पाणी किंवा विश्रांतीची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. तसेच, वाहतूक करणाऱ्यांकडे आवश्यक असलेली कोणतीही वैध कागदपत्रे किंवा आरोग्य प्रमाणपत्रे आढळून आली नाहीत.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. २२५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ (कलम 5A, 5B, 9) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, १९६० (Prevention of Cruelty to Animals Act) च्या विविध कलमांनुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, वाहनचालक भैय्या जगताप, ज्ञानदेव शंकर पवार (रा. डोंगरी वाडी, ता. पुरंदर) आणि जनावरांचा व्यवहार करणारा दत्ता पवार (रा. कडेपठार, जेजुरी, ता. पुरंदर) यांच्यासह इतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
गोवंश संरक्षण, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनतेचा विश्वास हेच उद्दिष्ट समोर ठेवून बारामती शहर पोलिसांनी निकट भविष्यात १०० पेक्षा अधिक गोवंश जनावरे सुरक्षितरित्या गोशाळांमध्ये दाखल करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. यासाठी विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. गोरक्षक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून राबविण्यात येणारी ही मोहीम सध्या बारामतीमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
पोलिसांचे आवाहन
गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीर वाहतूक, जनावरांवरील क्रूरता, अवैध कत्तल किंवा अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या बातमीदाराचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, महिला पोलीस हवालदार सीमा साबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, पोलीस शिपाई गिरीश नेवसे आणि ऋषिकेश जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा