पुणे/बारामती : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बारामती शहरातील आठवडे बाजार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य मार्केट आणि जळोची भाजी मार्केट गुरुवारी (दि. २२ जानेवारी २०२६) बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ ही सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सासवड-हारणी-वाल्हा-निरा-मोरगाव मार्गे बारामती शहरात प्रवेश करणार आहे. शहरात कसबा सर्कल, फलटण चौक, शिवाजी चौक, शाहू महाराज चौक ते इंदापूर रोडने लिमटेक येथील पालखी चौकातून पुढे जाणार आहे.
दुसरीकडे, गुरुवारी बारामती शहराचा आठवडे बाजार असतो. या दिवशी शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदी-विक्रीसाठी गर्दी करतात. तसेच बारामती शहरातील जळोची येथील फळभाजी मार्केट व कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य मार्केट पहाटे ५ वाजता चालू होत असल्याने, शेतकरी आपला माल विक्रीसाठी चारचाकी गाड्यांतून आणतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन स्पर्धेच्या मार्गात अडथळा निर्माण होण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून मार्केट बंद करण्यात आले आहे.
वरील परिस्थितीचा विचार करून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ‘मुंबई मार्केट अँड फेअर ॲक्ट १८६२’ च्या कलम ५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून
खालील मार्केट २२ जानेवारी रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत:
१. बारामती शहरातील आठवडे बाजार
२. कृषी उत्पन्न बाजार समिती (धान्य मार्केट)
३. जळोची फळभाजी मार्केट
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर ‘मुंबई मार्केट अँड फेअर ॲक्ट १८६२’ मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा