पुरंदर : तालुक्यातील आस्करवाडी हद्दीत असलेल्या हॉटेल कसोल कॅफेमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सासवड पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, हुक्का बार चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार तुषार बाळू लोंढे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून २०२६ रोजी मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांच्या सुमारास आस्करवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल कसोल कॅफेमध्ये काही इसम ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का पुरवत असल्याची आणि त्याठिकाणी हुक्का बार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला असता, आरोपी हे ग्राहकांना हुक्का पुरवताना आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण २६ हजार ३७० रुपयांचे हुक्का पिण्याचे साहित्य आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४ अ आणि २१ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार होळकर हे करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा