गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती एसटी स्टँडवर दहशतवाद्यांचा थरार! आपत्कालीन परिस्थिती व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बारामती शहर पोलीस सज्ज, बीडीडीएस पथकासह एसटी स्टँडवर यशस्वी ‘मॉक ड्रिल’

0
9
0
2
7
0
बारामती : नेहमीप्रमाणे गजबजलेले बारामती एसटी स्टँड…
प्रवाशांची मोठी वर्दळ…
आणि अचानक पोलिसांच्या गाड्यांचा ताफा सायरन वाजवत स्टँडवर धडकला! दोन संशयित दहशतवादी आणि त्यांच्याजवळील एक बॉम्बसदृश ब्रीफकेस…
या एका बातमीने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली. प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, काही क्षणांतच बारामती शहर पोलीस आणि बीडीडीएस (BDDS) पथकाने अंगावर काटा आणणाऱ्या या थरारक परिस्थितीवर मिळवलेले नियंत्रण पाहून सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. कारण, हा प्रत्यक्षातील दहशतवादी हल्ला नसून, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलिसांनी केलेली एक अतिशय वास्तववादी आणि थरारक ‘मॉक ड्रिल’ होती!
प्रभारी परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) श्रीमती मनिषा ओमासे आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ४० पोलीस अंमलदार व होमगार्ड्सच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण एसटी स्टँडचा ताबा घेतला. संशयितांना झडप घालून ताब्यात घेण्यात आले. परिसरातील प्रवाशांना अत्यंत वेगाने पण सुरक्षितपणे दूर हलवण्यात आले. त्यानंतर एंट्री झाली ती प्रशिक्षित श्वान ‘मॉन्टी’ आणि अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या विशेष बॉम्ब शोधक व नाशक (BDDS) पथकाची. त्यांनी अत्यंत शिताफीने ती बॉम्बसदृश ब्रीफकेस सुरक्षितस्थळी नेऊन निष्प्रभ करण्याचे डोळे दीपवणारे प्रात्यक्षिक दाखवले.
ही नुसतीच रंगीत तालीम नव्हती, तर प्रत्यक्ष संकटाच्या वेळी पोलीस किती वेगाने पोहोचतात आणि नागरिकांचे प्राण कसे वाचवतात, याची ती जिवंत परीक्षा होती. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा थरार रंगला.
DySP मनिषा ओमासे यांनी पदभार स्वीकारताच बारामतीकरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, पोलिसांच्या ‘इमर्जन्सी रिस्पॉन्स’ची धार अधिक तेज केली आहे. कोणतीही संकटाची वेळ आल्यास प्रत्येक अंमलदाराला आपली भूमिका अचूक माहिती असली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. तर, पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी मैदानावरील प्रत्यक्ष नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि सामान्य प्रवाशांमध्ये अनावश्यक घबराट पसरू न देण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका अचूकपणे पार पाडली.
धोका येण्याची वाट पाहायची नाही, तर धोक्याला तोंड देण्याची तयारी आधीच ठेवायची, हा स्पष्ट व कडक संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणतीही बेवारस बॅग, ब्रीफकेस किंवा संशयास्पद वस्तू दिसल्यास तिला अजिबात हात लावू नका, उघडू नका, तात्काळ पोलिसांना कळवा, असे महत्त्वाचे आवाहन बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
या सनसनाटी पण अत्यंत नियोजनबद्ध मॉक ड्रिलमुळे बारामती शहर पोलीस दल कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून २४ तास सज्ज असल्याची खात्री पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. बारामतीकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले हे आणखी एक अत्यंत ठोस आणि आश्वासक पाऊल ठरले आहे.





