शिक्रापूर, दि.२: शिक्रापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) समोर उभ्या असलेल्या क्रेटा कारची काच फोडून १० लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांचा माग काढण्यात शिक्रापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात कारवाई करत चोरीच्या रकमेपैकी २ लाख ९० हजार रुपये रोख जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अतुल सुभाष जेधे (वय ४०, रा. जेधेवस्ती, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ८ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास त्यांनी आपली क्रेटा कार शिक्रापूर येथील एसबीआय बँकेसमोर उभी केली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून आत ठेवलेली १० लाख रुपयांची रोकड पळवून नेली होती. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. या फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढण्यास सुरुवात झाली. माहितीच्या आधारे पोलीस पथकाने आरोपीच्या शोधासाठी दोन वेळा आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील बिटरगुंटा गाठले. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार विश्वंभर वाघमारे, अमोल नलगे आणि पोलीस कॉन्स्टेबल मच्छींद्र निचीत यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कप्पराल टिप्पा, बोगल मंडल आणि बिटरगुंटा येथे शोध मोहीम राबवली.
या तपासात रमेश बाबू गोडेट्टी (रा. कप्पराल टिप्पा, ता. बिटरगुंटा, जि. नेल्लोर) याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी छापा टाकून झडती घेतली असता, चोरीला गेलेल्या रकमेपैकी २ लाख ९० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिग्नेश कोळी, तुषार भोर, अंकुश कारंडे तसेच पोलीस हवालदार अमोल दांडगे, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, अमोल नलगे आणि पोलीस कॉन्स्टेबल नारायण वाळके, राम जाधव, मच्छींद्र निचीत, नागेश वाघमारे, भारत भोसले यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर आणि पोलीस कॉन्स्टेबल भारत भोसले करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा