Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सांगवीत उधारीवर सिगारेट न दिल्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला; बापाच्या डोक्यात आणि भावावर सपासप वार

0 5 9 3 8 7

बारामती : उधारीवर अवघी एक सिगारेट न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने आपल्या कुटुंबासह पानटपरी चालकाच्या कुटुंबावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील सांगवी येथे घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीचे वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले असून, माळेगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी (ता. बारामती) येथील एस.टी. स्टँड शेजारी ‘सुपर पान टपरी’ या नावाने व्यवसाय करणारे प्रतिक सुनिल जगताप (वय २४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवार, दिनांक १९/०१/२०२६ रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास आरोपी अभिषेक महादेव जगताप हा टपरीवर आला आणि त्याने उधारीवर सिगारेटची मागणी केली. प्रतिक यांनी उधारी देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या अभिषेकने प्रतिकला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

टपरीवर झालेला वाद आणि मारहाणीचा जाब विचारण्यासाठी प्रतिक आणि त्यांचा लहान भाऊ सार्थक सुनिल जगताप हे आरोपी अभिषेकच्या घरी गेले. मात्र, तिथे आरोपीचे वडील महादेव विश्वनाथ जगताप, आई गिता महादेव जगताप आणि बहीण काजल महादेव जगताप यांनी वाद घालत त्यांना पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी भांडण सोडवण्यासाठी प्रतिकचे वडील सुनिल जयसिंग जगताप त्या ठिकाणी पोहोचले. वडिलांना पाहताच आरोपी अभिषेक जगताप याने घरातून धारदार कोयता आणला आणि काहीही न बोलता थेट सुनिल जगताप यांच्या डोक्यात वार केला. वडिलांवर झालेला हल्ला पाहून भाऊ सार्थक मध्ये पडला असता, आरोपीने त्याच्याही डोक्यावर आणि डाव्या हाताच्या करंगळीवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.

तसेच, यावेळी फिर्यादीची चुलत आजी उषा मानसिंग जगताप यांना आरोपी महिलांनी शिवीगाळ करत जमिनीवर ढकलून देऊन जखमी केले. “तुम्ही माझ्या नादी लागला तर एकेकाला खल्लास करीन,” अशी जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जखमी अवस्थेत असतानाही जगताप कुटुंबाने माळेगाव पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. याप्रकरणी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे

१. अभिषेक महादेव जगताप

२. महादेव विश्वनाथ जगताप

३. गिता महादेव जगताप

४. काजल महादेव जगताप

(सर्व रा. सांगवी, ता. बारामती)

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ३५१(२), ३५२, ११५(२), ३(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास माळेगाव पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार संजय मोहिते करत आहेत. क्षुल्लक कारणावरून कोयत्यासारख्या हत्याराचा वापर झाल्याने सांगवी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे