गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती तालुक्यातील ४ सराईत गुन्हेगारांना २ वर्षांसाठी हद्दपार; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

0
9
1
8
9
4
पुणे/बारामती : गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४ सराईत गुन्हेगारांना पुणे आणि सातारा जिल्ह्यातील काही भागांतून दोन वर्षांसाठी (२४ महिने) हद्दपार करण्यात आले आहे. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी याबाबतचे अधिकृत आदेश पारित केले आहेत.
सुपा पोलीस ठाण्याकडून या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपार प्रस्ताव (क्र. ०१/२०२५) सादर करण्यात आला होता. या इसमांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अभिलेखाची तपासणी आणि सुनावणीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी या कारवाईचे अंतिम आदेश काढण्यात आले.
हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे खालीलप्रमाणे आहेत
१. वैभव तुकाराम शेलार (वय ३२ वर्षे, रा. मगरवाडी, ता. बारामती, जि. पुणे)
२. किरण मारुती गायकवाड (वय २५ वर्षे, रा. मगरवाडी, ता. बारामती, जि. पुणे)
३. अनिकेत प्रदीप काळे (वय २८ वर्षे, रा. करंजे, ता. बारामती, जि. पुणे)
४. अमोल पोपट गायकवाड (वय ३४ वर्षे, रा. गायकवाडवस्ती, मगरवाडी, ता. बारामती, जि. पुणे)
या चारही जणांना २४ महिन्यांच्या कालावधीसाठी पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व हवेली तालुके, तसेच पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातूनही त्यांना हद्दपार करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांचा इशारा
या दोन वर्षांच्या कालावधीत सदर इसमांनी हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून संबंधित हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्यास, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.



