अपघातअभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळा: १ जानेवारीला पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

0
3
9
4
5
7
पुणे: कोरेगाव भीमा (पेरणे फाटा, ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी १ जानेवारी २०२६ रोजी राज्यभरातून आणि परराज्यातून लाखो अनुयायी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी निर्गमित केले आहेत.
दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपासून ते १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील.

🚫 या मार्गांवर वाहतुकीस प्रवेश बंदी
पुढील मार्गांवरून सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलीस, पीएमपीएमएल बसेस आणि अनुयायांची वाहने वगळून) प्रवेश बंद करण्यात आला आहे:
१. पुणे-नगर रोड: पुणे शहरातून खराडी बायपास – वाघोली – लोणीकंद – थेऊर फाटा – तुळापूर फाटा ते पेरणे गाव (भीमा नदी ब्रिज) पर्यंत.
२. मरकळ रोड: मरकळ नदी ब्रिज ते तुळापूर फाटा.
३. केसनंद मार्ग: वाघोली – केसनंद फाटा – केसनंद गाव – मगर वस्ती ते लोणीकंद (थेऊर फाटा).
४. सोलापूर रोड लिंक: सोलापूर रोड (थेऊर फाटा) – थेऊर गाव – कोलवडी – केसनंद गाव – मगर वस्ती ते लोणीकंद.
५. विश्रांतवाडी-लोहगाव: विश्रांतवाडी – लोहगाव – वाघोली आणि वाघोलीकडून विश्रांतवाडीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
जड वाहनांसाठी कडक निर्बंध
दिनांक ३१.१२.२०२५ ते ०१.०१.२०२६ या कालावधीत पुणे शहरात आणि खालील प्रवेशद्वारांवरून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना (ट्रक, डंपर, मिक्सर, इ.) पूर्णपणे प्रवेश बंदी असेल:
* थेऊर फाटा (लोणी काळभोर)
* हॅरीस ब्रिज (खडकी)
* बोपखेल फाटा (विश्रांतवाडी)
* राधा चौक (बाणेर)
* नवले ब्रिज (वारजे)
* कात्रज चौक
* खडीमशीन चौक (कोंढवा)
* मंतरवाडी फाटा (फुरसुंगी)
* मरकळ ब्रिज.
सामान्य प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग (Diversions):
अनुयायांची वाहने वगळता इतर प्रवाशांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा:
१. पुणे ते अहिल्यानगर:
खराडी बायपास – हडपसर – सोलापूर रोड – केडगाव चौफुला – न्हावरा – शिरूर मार्गे अहिल्यानगरकडे जावे.
२. मुंबई ते अहिल्यानगर:
मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवरून तळेगाव दाभाडे – चाकण – शिक्रापूर मार्गे नगरकडे जावे. किंवा खडकी – हॅरीस ब्रिज – येरवडा – खराडी बायपास – हडपसर – सोलापूर रोड – केडगाव चौफुला मार्गे जावे.
३. सोलापूर/मराठवाडा ते नगर:
सोलापूर रोडने केडगाव चौफुला – न्हावरा – शिरूर मार्गे.
४. कोल्हापूर/सातारा ते नगर:
कात्रज चौक – खडीमशीन चौक – मंतरवाडी फाटा – हडपसर – सोलापूर रोड – केडगाव चौफुला – न्हावरा – शिरूर मार्गे.
अनुयायांसाठी पार्किंग व्यवस्था:
विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांसाठी विविध मार्गांवर पार्किंगची सोय करण्यात आली आहे:
* नगर रोडने येणाऱ्यांसाठी: लोणीकंद ‘आपले घर’ शेजारी, बौद्ध वस्ती शेजारी आणि तुळापूर फाटा येथे.
* सोलापूर रोडने (थेऊर मार्गे) येणाऱ्यांसाठी: थेऊर रोड, खंडोबा माळ आणि वेअर हाऊस शेजारी.
* आळंदी-मरकळ रोडने येणाऱ्यांसाठी: तुळापूर रोडवर विविध ठिकाणी पार्किंग उपलब्ध आहे. महत्वाची सूचना: मरकळ पूल जड वाहनांसाठी बंद असून, तेथून फक्त अनुयायांच्या हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश मिळेल. बसेसनी चाकण-शिक्रापूर मार्गाचा वापर करावा.
नागरिकांनी व वाहन चालकांनी या बदलांची नोंद घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.







