अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमीसामाजिक
आशा वर्कर्सनी अनुभवला पडद्यावरचा ‘आशा’; ‘रिल’ लाईफमधील संघर्ष पाहताना ‘रियल’ लाईफमधील आशा सेविका गहिवरल्या! शिवा काका कारंडे फाउंडेशनची अनोखी भेट; ५५ आशा सेविकांची बारामतीत खास ‘सिनेवारी’

0
3
9
4
5
7
वडगांव निंबाळकर : उन्हातान्हात फिरून ग्रामीण आरोग्याचा डोलारा सांभाळणाऱ्या ‘आशा’ सेविकांच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ तसा कमीच. मात्र, सोमवारी (दि. ५) सोमेश्वरनगर परिसरातील ५५ आशा सेविकांनी आपल्या कामाचा ताण बाजूला ठेवत एक दिवस स्वतःसाठी जगून घेतला. निमित्त होते, शिवा काका कारंडे फाउंडेशनच्या अध्यक्षा रेणुका कारंडे यांनी आयोजित केलेल्या खास ‘सिनेवारी’चे! त्यांनी पुढाकार घेत आशा सेविकांच्या जीवनावर आधारित ‘आशा’ चित्रपटाचा खास शो आणि सहलीचे आयोजन केले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अभिनेत्री रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत असलेला ‘आशा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. होळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या निंबूत ते कोऱ्हाळे परिसरातील आशा सेविकांना हा चित्रपट पाहण्याची इच्छा होती. मात्र, जवळच्या वाणेवाडी चित्रपटगृहात हा सिनेमा लागला नव्हता आणि बारामतीमध्ये सायंकाळी ७ वाजताचा शो असल्याने, काम संपवून रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबणे महिलांना शक्य नव्हते.
आशा सेविकांनी आपली ही अडचण शिवा काका कारंडे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रेणुका स्वप्नील कारंडे यांच्या कानावर घातली. महिलांची ही इच्छा समजताच रेणुका ताईंनी क्षणाचाही विलंब न लावता बारामती येथील ‘तारा चित्रपटगृहात’ सोमवारी दुपारी १२ वाजताचा संपूर्ण शो बुक केला. एवढेच नाही तर, सर्व ५५ महिलांच्या प्रवासासाठी ५० सीटर लक्झरी बसची खास व्यवस्थाही केली.
या उपक्रमात आशा वर्कर्स आणि सीआरपी (CRP) मिळून ५५ महिला सहभागी झाल्या होत्या.

बसमधून बारामतीला जाताना गाण्यांच्या तालावर ठेका धरत आणि गाणी गात महिलांनी प्रवासाचा मनमुराद आनंद लुटला. मात्र, चित्रपट सुरू होताच वातावरण बदलले. पडद्यावर दिसणारा ‘आशा’चा संघर्ष, तिची धावपळ हे सर्व काही आपल्याच आयुष्यातील आहे, हे पाहून अनेकजणींचे डोळे पाणावले.
चित्रपट संपवून आनंदनगर आरोग्य केंद्रावर परतल्यानंतर आशा सेविकांनी रेणुका कारंडे यांचे मनापासून आभार मानले. “आमच्या कष्टाची जाणीव ठेवून आम्हाला हा आनंदाचा दिवस दिल्याबद्दल आम्ही ऋणी आहोत,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यात आशा सेविकांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांच्या कामाचा व्याप मोठा आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या धकाधकीच्या जीवनात चार क्षण आनंदाचे मिळावेत, या उद्देशाने आम्ही हा छोटासा प्रयत्न केला. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान हेच आमचे यश आहे.”
सौ. रेणुका स्वप्नील कारंडे (अध्यक्षा, शिवा काका कारंडे फाउंडेशन)




