गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमीसामाजिकसोशल मिडिया
मोबाईल हरवला? चिंता नको! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; १ लाख १० हजारांचे ११ मोबाईल मूळ मालकांच्या हाती

0
3
9
4
5
7
बारामती : आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा केवळ संवादाचे माध्यम नसून तो माणसाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अशा वेळी महागडा मोबाईल हरवणे किंवा चोरीला जाणे, हे एखाद्या मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नसते. मात्र, बारामती तालुका पोलिसांनी नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या विषयात लक्ष घालत, तांत्रिक तपासाच्या जोरावर तब्बल ११ मोबाईल शोधून काढत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत मोबाईल गहाळ झाल्याच्या आणि चोरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या पथकाला मोबाईल ट्रेसिंगच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलिसांच्या टीमने पारंपरिक तपासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. सायबर गुन्हेगारीच्या या युगात तांत्रिक पुराव्यांचे आणि ‘क्ल्यूज’चे अचूक विश्लेषण करत पोलिसांनी अत्यंत शिताफीने ११ मोबाईल हँडसेटचा माग काढला. या ११ मोबाईलची एकूण किंमत अंदाजे १ लाख १० हजार रुपये इतकी आहे.

पोलिसांनी शोधलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपला हरवलेला मोबाईल परत मिळणार, हे समजताच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी अभिजित अनिल जाधव (रा. शारदानगर), महेंद्र मुरलीधर दांडे, संजय काशिनाथ अहिरराव (दोघे रा. सूर्यनगरी) आणि सोनाली संतोष सातपुते (रा. बारामती) यांना त्यांचे मोबाईल सन्मानपूर्वक परत करण्यात आले. इतरही मोबाईल धारकांशी संपर्क साधून त्यांचे मोबाईल त्यांना सुपूर्द करण्याची प्रक्रिया सध्या पोलीस ठाण्यात सुरू आहे.
ही धडाकेबाज कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत बारामती तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार राजू बन्ने आणि अविनाश भागवत यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तांत्रिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे मोबाईल शोधणे शक्य झाले. मोबाईल परत करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, उपनिरीक्षक अमोल कदम, दिपाली गायकवाड, धनश्री भगत आणि युवराज पाटील उपस्थित होते.
बारामती तालुका पोलिसांच्या या तत्परतेचे आणि कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “पोलिस आपल्या दारी आणि मदतीला” या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा बारामतीकरांना आला आहे.






