गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
फिल्मी स्टाईलने अपहरण, व्हिडीओ कॉलवरून ‘लाइव्ह’ मारहाण; जमिनीच्या वादातून तरुणांचा थरार, वडगांव निंबाळकर पोलीसांनी केले ४ आरोपी गजाआड!

0
3
9
4
5
7
वडगाव निंबाळकर: मावळ तालुक्यातील जमिनीच्या वादाचे पर्यवसान एका थरारक अपहरणात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा हॉटेलमधून एका तरुणाचे फिल्मी स्टाईलने अपहरण करून, त्याला उसाच्या शेतात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, या मारहाणीचा व्हिडीओ कॉलद्वारे ‘लाइव्ह शो’ करून मुख्य सूत्रधाराने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडगाव निंबाळकर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा पर्दाफाश करत ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संदीप गोरख होळकर (रा. सदोबाचीवाडी, ता. बारामती) हे दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास वडगाव निंबाळकर येथील ‘हॉटेल इंडिया बार अँड परमिट रूम’ येथे होते. यावेळी उर्से (ता. मावळ) येथील एका जमिनीच्या वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपी तेजस उर्फ बंटी हनुमंत होळकर हा आपल्या तीन साथीदारांसह पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून तिथे धडकला.
काही कळायच्या आतच आरोपींनी संदीप यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबले आणि अज्ञात ठिकाणी नेले. एका कॅनॉलच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात नेऊन आरोपींनी संदीप यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
व्हिडीओ कॉलवर दिली जीवे मारण्याची धमकी
या घटनेतील सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे, मारहाण चालू असताना आरोपी बंटी होळकर याने फरार आरोपी शंभू दादासो कारंडे याला मोबाईलवरून व्हिडीओ कॉल लावला. संदीपला मारहाण होत असतानाचे दृश्य शंभू कारंडेला लाईव्ह दाखवण्यात आले. यावेळी शंभू याने, “माझ्या आणि शंभूच्या नादाला लागला तर जीवे मारून टाकू,” अशी धमकी दिली. यानंतर फिर्यादीस जबरदस्तीने दारू पाजण्यात आली आणि होळ (ता. बारामती) येथे सोडून देऊन आरोपी पसार झाले.
फिर्यादी संदीप होळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला (गु.र.नं. २९४/२०२५). हॉटेल इंडिया बार अँड परमिट रूम’ येथील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.

पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे
* तेजस उर्फ बंटी हनुमंत होळकर (मुख्य आरोपी)
* साहिल लक्ष्मण गायकवाड (वय २२, रा. मुरूम, ता. फलटण)
* संकेत नामदेव भिसे (वय २२, रा. होळ, ता. बारामती)
* सनी संदीप सकट (वय २३, रा. आनंदनगर, सस्तेवाडी, ता. बारामती)
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (MH 14 GY 2200) आणि मारहाणीसाठी वापरलेले लाकडी दांडके जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नागनाथ पाटील करीत असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. जमिनीच्या वादातून घडलेल्या या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.






