अभिव्यक्तीक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीचा ‘पार्थ’ ठरला क्रिकेटचा ‘अर्जुन’! एमसीए १९ वर्षाखालील स्पर्धेत पार्थ शिंदेची अष्टपैलू कामगिरी; ३१७ धावांसह ३७ बळींचा विक्रम

0
3
9
4
5
7
बारामती: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित १९ वर्षाखालील इन्विटेशन व सुपर लीग स्पर्धेत बारामतीच्या पार्थ शिंदे याने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करत पार्थने स्पर्धेत तब्बल ३१७ धावा आणि ३७ बळी टिपण्याची किमया साधली आहे.

विलास क्रिकेट क्लबकडून दमदार सुरुवात
स्पर्धेच्या इन्विटेशन टप्प्यात पार्थ शिंदे याने येवलेवाडी येथील ‘विलास क्रिकेट क्लब’चे प्रतिनिधित्व केले. या टप्प्यात त्याने फलंदाजीत २१२ धावा कुटल्या, तर गोलंदाजीत २५ गडी बाद करत आणि क्षेत्ररक्षणात ७ झेल घेत आपली छाप पाडली.
‘अँबिशिअस’ (Ambitious) संघाविरुद्ध झालेला सामना पार्थसाठी अविस्मरणीय ठरला. या एकाच सामन्याच्या एका डावात त्याने गोलंदाजीत ८ गडी बाद करण्याचा पराक्रम केला, तर फलंदाजीत ४१ आणि ५८ धावांची झुंजार खेळी केली. या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. पार्थच्या नेतृत्वाच्या खाली विलास क्रिकेट क्लबला २३ गुण मिळाले, परंतु दुर्दैवाने हा संघ सुपर लीगसाठी पात्र ठरू शकला नाही.

सुपर लीगमध्ये निवड आणि सातत्यपूर्ण खेळ
संघाचे आव्हान संपले असले तरी, पार्थ शिंदे आणि त्याचा सहकारी साईराज शेलार यांची वैयक्तिक कामगिरी पाहता त्यांची निवड सुपर लीगसाठी (प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी इलेव्हन) करण्यात आली. पार्थची निवड ‘प्रेसिडेंट इलेव्हन’ संघात झाली.
सुपर लीगमध्येही पार्थने आपला फॉर्म कायम राखला. ‘जेट सेव्हन स्पोर्ट्स’ विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने अवघ्या ३२ चेंडूत ५० धावांची आक्रमक खेळी करत संघाची धावसंख्या २६० पर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गोलंदाजीत त्याने आपली धार कायम ठेवत ट्रिनिटी (Trinity) आणि अँबिशिअस या दोन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी ५ बळी घेण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे, स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या अँबिशिअस क्लबच्या गुंजन सावंतला आणि ट्रिनिटी क्लबच्या आदित्य शिंदेला त्याने प्रत्येकी दोन वेळा बाद करत प्रतिस्पर्धी संघाच्या मुख्य फलंदाजांवर वर्चस्व गाजवले.





