आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
सावधान! ‘ई-चलन’ किंवा ‘लायसन्स सस्पेंड’चा मेसेज आलाय? एका क्लिकवर होऊ शकते फसवणूक; परिवहन विभागाचा सतर्कतेचा इशारा

0
3
9
4
5
7
बारामती: सध्या सायबर गुन्हेगार नवनवीन मार्गांनी नागरिकांची फसवणूक करत आहेत. आता या गुन्हेगारांनी थेट वाहनचालकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. वाहन परवाना (Driving License), वाहन नोंदणी आणि ई-चलन (E-Challan) यांच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांना एसएमएस (SMS) किंवा व्हॉट्सॲपद्वारे (WhatsApp) संदेश पाठवले जातात. यामध्ये “तुमचे ई-चलन बाकी आहे” किंवा “तुमचे लायसन्स सस्पेंड (रद्द) होणार आहे,” अशी भीती घालण्यात येते. या मेसेजसोबत एक पेमेंट लिंक दिलेली असते. नागरिक घाबरून या लिंकवर क्लिक करतात आणि पैसे भरण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ही लिंक बनावट असल्याने नागरिकांचे पैसे सायबर भामट्यांच्या खात्यात जमा होतात, तसेच त्यांची वैयक्तिक माहितीही चोरीला जाते.
या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना बारामतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी सांगितले की, “परिवहन कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांना कधीही व्हॉट्सॲपवर पेमेंट लिंक पाठवली जात नाही.” त्यामुळे अशा कोणत्याही अनाधिकृत लिंकवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
या बोगस ॲप्सपासून सावध राहा
सायबर चोरटे नागरिकांना काही विशिष्ट ॲप्स (APKs) डाऊनलोड करण्यास भाग पाडतात. यामध्ये प्रामुख्याने खालील ॲप्सचा समावेश आहे:
* RTO Services.apk
* mParivahan_Update.apk
* eChallan Pay.apk
ही ॲप्स अधिकृत नसून ती तुमच्या मोबाईलमधील संवेदनशील माहिती चोरी करू शकतात.
* आरटीओ (RTO) व्हॉट्सॲपवर कधीही पेमेंट लिंक पाठवत नाही.
* मोबाईलमध्ये अनोळखी APK फाईल इन्स्टॉल करू नका.
* केवळ gov.in असलेल्या सरकारी वेबसाईटवरच विश्वास ठेवा.
* फसवणूक झाल्यास १९३० वर कॉल करा.
अधिकृत कामासाठी फक्त या संकेतस्थळांचाच वापर करा
नागरिकांनी आरटीओशी संबंधित कोणत्याही कामासाठी केवळ सरकारच्या अधिकृत (Gov.in) संकेतस्थळांचाच वापर करावा. ज्या वेबसाईटच्या शेवटी .com, .online, .site असे डोमेन आहेत, त्या लिंक उघडू नयेत.
* वाहन नोंदणी सेवा: https://vahan.parivahan.gov.in
* ड्रायव्हिंग लायसन्स सेवा: https://sarathi.parivahan.gov.in
* परिवहन सेवा: https://www.parivahan.gov.in
* ई-चलन: https://echallanparivahan.gov.in
जर कोणासोबत असा फसवणुकीचा प्रकार घडला असेल किंवा संशयास्पद लिंक आली असेल, तर त्यांनी तात्काळ १९३० या सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच https://www.cybercrime.gov.in या पोर्टलवर किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.






