गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
पुणे ग्रामीण (माळेगाव) पोलिसांची मोठी कारवाई गुन्हेगाराला शस्त्रास्त्रांसह ठोकल्या बेड्या, दोन गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि रायफलसह सराईत गुन्हेगार गजाआड

0
7
2
7
0
1
बारामती/पुणे: हॉटेलसमोर बसलेल्या एका संशयिताची नजर अचानक पोलिसांवर पडते… पोलिसांची चाहूल लागताच तो तिथून धूम ठोकण्याचा प्रयत्न करतो… पण माळेगाव पोलिसांचे पथक फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्याच्यावर झडप घालते! त्याची अंगझडती घेताच पोलिसांच्याही भुवया उंचावतात. कारण, त्याच्या कमरेला चक्क दोन गावठी पिस्तूल आणि खिशात जिवंत काडतुसे सापडतात! पुणे ग्रामीण पोलिसांच्या माळेगाव पोलीस स्टेशनने केलेल्या या थरारक कारवाईत एका अट्टल गुन्हेगाराला गजाआड करण्यात यश आले आहे.

अक्षय कल्याण तावरे (वय ३५ वर्षे, रा. वाघवस्ती, सांगवी, ता. बारामती) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल २६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, माळेगाव हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरू होता. याच दरम्यान, १३ जून २०२६ रोजी माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि कुलदीप संकपाळ यांना एका गुप्त बातमीदाराकडून धक्कादायक माहिती मिळाली. सांगवी गावातील वाघवस्ती येथे राहणारा सराईत गुन्हेगार अक्षय तावरे हा कमरेला पिस्तूल लावून काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची टीप पोलिसांना मिळाली.
क्षणाचाही विलंब न करता सपोनि संकपाळ आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने सांगवी गाव गाठले. शोध घेत असताना, संशयित अक्षय हा गावातील कार्तिक हॉटेल समोर खुर्चीवर बसलेला दिसला.
पोलीस पथक आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच अक्षयच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने खुर्चीवरून उठून थेट पळ काढला. मात्र, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याचा पाठलाग केला आणि त्याला जागीच पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या.
तपासात उलगडले धक्कादायक सत्य आणि शस्त्रास्त्रांचे घबाड
अक्षयला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची आणि त्याच्या घराची कसून झडती घेतली. या झडतीतून शस्त्रास्त्रांचे मोठे घबाड हाती लागले:
• कमरेला लपवलेली शस्त्रे: अंगझडतीत त्याच्याकडे २ गावठी बनावटीचे पिस्तूल, २ जिवंत काडतुसे आणि वापरलेल्या काडतुसांच्या २ रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या.
• गोठ्यात लपवलेली रायफल: अक्षयला त्याच्या वाघवस्ती येथील घरी नेऊन घराशेजारील गोठ्याची झडती घेतली असता, तेथे एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवून ठेवलेली १ रायफल देखील जप्त करण्यात आली.
पोलिसी खाक्या दाखवताच अक्षयने कबुली दिली की, त्याने ही सर्व शस्त्रे ८ महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातून आणली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या गावठी पिस्तुलची चाचणी घेण्यासाठी त्याने शिरवली येथील नीरा नदीच्या पात्रात हवेत गोळीबार (फायरिंग) केला होता. खिशात सापडलेल्या २ रिकाम्या पुंगळ्या त्याच गोळीबारातील असल्याचे उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेला अक्षय तावरे हा अत्यंत सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे ग्रामीण, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मालमत्तेविरुद्धचे आणि मानवी शरीराविरुद्धचे एकूण २६ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अन्वये माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (गु.र.नं. १५४/२०२६) दाखल करण्यात आला असून, त्याला १६ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) श्री. संदीपसिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी अधिकारी सपोनि कुलदीप संकपाळ, पोउनि डी.आर. साळवे, तुषार भोर आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी (विजय वाघमोडे, राहुल पांढरे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, अमोल कोकरे, नंदकुमार टकवणे, अमोल वाघमारे, जयसिंग कचरे) ही धडक कामगिरी केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपी अटकेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिराजदार यांची पत्रकार परिषद



