बारामती : विद्यार्थीदशेत असताना नेहमी चांगली संगत निवडावी. चुकीची संगत आयुष्य बरबाद करू शकते. अमली पदार्थांच्या सेवनाने गंभीर गुन्हे घडतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी यापासून दूर राहावे, असे आवाहन सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी केले.
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालय, आंबी बुद्रुक येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाअंतर्गत सपोनि. नवसरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळात केवळ मजा म्हणून केलेले व्यसन नंतरच्या काळात उग्र स्वरूप धारण करते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत प्रचंड ऊर्जा असते, त्यामुळे या ऊर्जेचा सकारात्मक वापर करायला हवा. अमली पदार्थांच्या सेवनाने गंभीर अपघात होतात. सध्या अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीतील वाढते प्रमाण चिंताजनक आहे. रिल आणि रिअल आयुष्य वेगळे असून विद्यार्थ्यांनी आभासी दुनियेत जगू नये.
सायबर जनजागृतीवर बोलताना त्यांनी सांगितले की, या वयात विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करावा आणि सोशल मीडिया साईट्सपासून दूर राहावे. अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नयेत, कोणत्याही एपीके फाईल्स डाऊनलोड करू नयेत आणि आपला ओटीपी कुणालाही सांगू नये. तसेच डिजिटल अवेअरनेसबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांनाही माहिती द्यावी.
वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, अल्पवयीन मुलांनी दुचाकी चालवल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल होणार असून मोठा दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाहने चालवू नयेत. तसेच रस्ते अपघाताच्या वेळी दुचाकीस्वारांच्या डोक्यावर हेल्मेट असेल तर गंभीर दुखापतीची शक्यता कमी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना, ‘आम्हाला नवीन ड्रेस नको, तर तुम्ही स्वतःसाठी हेल्मेट विकत घ्या,’ असा आग्रह धरावा.
मुलींच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मुलींना कुणीही त्रास देत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असेल तर त्याला ठामपणे विरोध करावा आणि याची माहिती तत्काळ आपले पालक किंवा शिक्षकांना द्यावी.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गार्डी, आंबी बुद्रुकच्या सरपंच शितल जगताप, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयकुमार शिंदे, पोलीस कर्मचारी तुषार जैनक, सोमनाथ होले, निहाल वणवे आणि सारिका जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील शिक्षक हेमंत गडकरी यांनी केले, तर सूत्रसंचालन संतोष जेधे यांनी केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा