बारामती: महाविद्यालयात जाणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुरज विनायक भोसले (रा. तरडोली, ता. बारामती, जि. पुणे) याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२५ ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पीडित तरुणी सुपे येथे महाविद्यालयात जात असताना आरोपीने तिला मोरगाव येथील चौकात अडवले. मला तुझ्याकडे काम आहे, असे सांगून त्याने तिला दुचाकीवरून कर्हावागज (ता. बारामती) येथील हॉटेल आणि लॉजवर नेले. तिथे त्याने तिला ‘तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करणार आहे’ असे सांगून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, याबद्दल कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
यानंतरही आरोपीने १३ नोव्हेंबर, १ डिसेंबर आणि १६ डिसेंबर २०२५ रोजी पीडितेला वारंवार धमकावून तिच्यावर अत्याचार केले. तसेच, फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकत जिवे मारण्याच्या धमक्या तो देत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी आरोपी सुरज भोसले याच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोक्सो) कलम ४, ६, ८, १२ आणि भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याची नोंद हवालदार एस. बी. इनामदार यांनी केली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा