गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
बारामती तालुका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: चोरीला गेलेले लाखो रुपयांचे दागिने फिर्यादींना परत

0
8
0
9
0
7
बारामती : तालुका पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालत सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक अत्यंत सकारात्मक आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करत तब्बल पाच लाख नव्वद हजार रुपयांचे चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत केले आहेत.

पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पहिल्या घटनेत, बारामती ॲग्रो कंपनीत कार्यरत असलेल्या सौ. सुप्रिया विक्रम पवार यांचे एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले होते. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेले मंगळसूत्र जप्त केले. दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे मंगळसूत्र फिर्यादी सौ. सुप्रिया पवार यांना सन्मानपूर्वक परत केले. आपली कष्टाची कमाई परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे भरभरून आभार मानले आहेत.

दुसऱ्या एका जुन्या गुन्ह्यात पोलिसांनी चिकाटीने तपास करत यश मिळवले आहे. जून २०२१ मध्ये माळेगाव बुद्रुक येथील शेतकरी श्री. अरुण लक्ष्मण जाधव यांच्या घरातून साडेचार लाख रुपये किमतीचे पावणे सहा तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी बाळकृष्ण तात्याबा यादव आणि महेश भिमा शिंदे या दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याच्या तीन अंगठ्या आणि एक सोन्याची लगड असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशान्वये दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी हे दागिने श्री. अरुण जाधव यांना परत देण्यात आले आहेत. अनेक वर्षांनंतर आपले चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्याने जाधव कुटुंबाने मोठा आनंद व्यक्त केला.



