ब्रेकिंग
आठवडे बाजारात चोरी करणाऱ्या दोन महिला रंगेहाथ जेरबंद शिक्रापूर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला यश

0
7
3
1
2
8
शिक्रापूर: शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारात वाढत्या मोबाईल आणि दागिने चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. बाजारात पेट्रोलिंग करत असताना एका लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
आठवडे बाजारात नागरिक, शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने येत असल्याने या गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर चोरी करत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही बाजारात विशेष पेट्रोलिंग आणि वाहतूक नियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच लाऊड स्पीकरवरून नागरिकांना सतत सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. महिलांनी दागिने आणि पर्स सांभाळावी, तर पुरुषांनी मोबाईल शर्टच्या वरच्या खिशात ठेवू नये, अशा सूचना ध्वनिक्षेपकाद्वारे दिल्या जात आहेत.
या मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक महेश डोंगरे, सोमनाथ कचरे, अंमलदार पल्लवी वाघोले, अमोल दांडगे आणि नारायण वाळके यांचे पथक शिक्रापूर बाजारात गस्त घालत होते. त्यावेळी दोन महिला संशयास्पदरीत्या वावरताना त्यांच्या निदर्शनास आल्या. पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले असता, त्या एका लहान मुलाच्या गळ्यातील दागिना चोरण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या दोघींनाही ताब्यात घेतले.

सारिका राजू जाधव (वय ४२) आणि साक्षी मेघराज पवार (वय ३०, दोघीही रा. मंतरवाडी, हडपसर, पुणे) अशी या ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत. चौकशीत त्यांनी चोरीच्या उद्देशानेच बाजारात आल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर हे करत आहेत.




