गुन्हेगारीदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
खाकी वर्दीचा ‘काळा’ चेहरा: २५ कोटींचे ‘एमडी’ ड्रग्स, रक्षकच बनला भक्षक! पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या घटनेने राज्यभर खळबळ.

0
4
7
3
2
9
पुणे/अहिल्यानगर: पोलीस दलाच्या इतिहासातील एक अत्यंत लाजीरवाणी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या खाकी वर्दीवर समाजाने विश्वास टाकला, ज्या हातांनी गुन्हेगारीचा बीमोड करायचा, त्याच हातांनी कायद्याच्या मंदिरातच चोरी केली.
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील (LCB) एका पोलीस अंमलदाराने चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातील मुद्देमाल कक्षातून कोट्यवधींचे जप्त एमडी (मेफेड्रोन) चोरून विकले आणि त्याऐवजी तिथे मैदा भरून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. सुमारे २५ कोटी रुपयांच्या या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश पुणे ग्रामीण आणि शिरूर पोलिसांनी केला असून, या ‘खाकी’तील काळ्या धंद्याचा थरार एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवणारा आहे.

स्थळ: पुणे-नगर महामार्ग, शिरूर.
वेळ: मध्यरात्र उलटून गेलेली… पहाटेची चाहूल.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) टीम शिरूरमध्ये दाखल झाली होती. खबर पक्की होती, पण या कारवाईचा शेवट पोलीस दलाच्याच पायाखालची जमीन सरकवणारा असेल, याची कल्पना खुद्द छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनाही नव्हती.
अंक १: शिरूरमधील पहिली ठिणगी
या महाकाय घोटाळ्याची सुरुवात शिरूरमध्ये झाली. पुणे ग्रामीण एलसीबी आणि शिरूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गॅरेज चालक शादाब रियाज शेख याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत १ किलो ५१ ग्रॅम एमडी सापडले, ज्याची किंमत तब्बल २ कोटी १० लाख रुपये होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने पोलिसांना संशय आला की, हा केवळ एक प्यादा आहे, मुख्य सूत्रधार वेगळाच आहे.
अंक २: धागेदोरे आणि २५ कोटींचे घबाड
पोलिसांनी शादाबला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पोपटासारखी माहिती दिली. तपासाची चक्रे वेगाने फिरली. धागेदोरे थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर आणि श्रीगोंदे तालुक्यांकडे वळले. पोलिसांनी कुरुंद, कोहकडी, हिंगणी आणि हमालवाडी येथे छापेसत्र सुरू केले.
यातच पारनेर तालुक्यातील कुरुंद येथील ज्ञानेश्वर बाळू शिंदे याच्या घरावर टाकलेला छापा निर्णायक ठरला. तिथे पोलिसांना जे दिसले ते पाहून त्यांचे डोळे विस्फारले. तिथे तब्बल ९ किलो ६५५ ग्रॅम एमडीचा साठा सापडला! याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत २० ते २२ कोटी रुपये आहे. शिरूरमधील २ कोटी आणि हे २० ते २२ कोटी, असे मिळून सुमारे २५ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले.

अंक ३: मास्टरमाइंडचा धक्कादायक खुलासा – रक्षकच बनला भक्षक!
इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येते कोठून? याचा शोध घेत असताना तपासाची सुई अहिल्यानगर पोलीस दलाच्या दिशेने फिरली. आणि अखेर या रॅकेटचा मुख्य ‘व्हिलन’ समोर आला – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) कार्यरत असलेला पोलीस अंमलदार श्यामसुंदर विश्वनाथ गुजर (वय ३९).
गुजरला ताब्यात घेऊन जेव्हा कसून चौकशी केली गेली, तेव्हा जे सत्य समोर आले त्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली. गुजरकडे अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सुरक्षित कक्षाच्या चाव्या होत्या, जिथे विविध कारवायांमध्ये जप्त केलेले ड्रग्ज व इतर अमली पदार्थांचा मुद्देमाल ठेवला जातो. तिथे सुमारे १०० किलोहून अधिक जप्त एमडी होते.

अंक ४: ‘मैदा’ मॉडस ऑपरेंडी (M.O.)
गुजरची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत धूर्त होती. ‘नार्को टेस्ट’ (अमली पदार्थ हाताळणी) संबंधी कामाचा अनुभव असल्याने त्याला ड्रग्जची माहिती होती. तो स्वतःच्याच ताब्यात असलेल्या कक्षातून ओरिजनल, जप्त केलेले एमडी ड्रग्ज हळूच बाहेर काढायचा. ही चोरी कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून, तो जेवढे ड्रग्ज काढायचा, तेवढ्याच वजनाचा ‘मैदा’ त्या पाकिटांमध्ये अत्यंत बेमालूमपणे मिसळत असे!
खाकी वर्दीच्या आड लपून त्याने हा गोरखधंदा सुरू केला होता. हा चोरलेला माल विकण्यासाठी त्याने काही स्थानिक तरुणांना आणि एका बडतर्फ पोलिसाला हाताशी धरले होते.
अंतिम अंक: अटकेचे सत्र आणि खात्याची नाचक्की
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मुख्य सूत्रधार पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुजर, शादाब शेख, ज्ञानेश्वर शिंदे, ऋषिकेश प्रकाश चित्तर (रा. कुरुंद) आणि महेश दादाभाऊ गायकवाड (रा. हिंगणी) या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. शिरूर न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत (ता. २७) पोलीस कोठडी सुनावली आहे.




