बारामती: विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत स्वतःच्याच पक्षकाराची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती येथील एका वकिलाला न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेवर डल्ला मारल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बापू बाबुराव दिवेकर असे शिक्षा झालेल्या वकिलाचे नाव आहे. या प्रकरणाचा निकाल बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट क्र. ५) टी. डी. इंगवले यांनी ३१ जुलै २०२६ रोजी दिला.
या प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब दत्तात्रय रणसिंग यांच्या पत्नीचे २२ फेब्रुवारी २०१५ रोजी मोटार अपघातात निधन झाले होते. या अपघाताच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यासाठी त्यांनी अॅड. दिवेकर यांची वकील म्हणून नियुक्ती केली होती. न्यायालयाच्या निकालानंतर नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाल्यावर, फिर्यादी आणि त्यांच्या अविनाश व तुषार या दोन मुलांच्या नावे बारामतीतील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये संयुक्त खाते उघडण्यात आले.
वकिली फी आणि न्यायालयीन कामकाजासाठी एक लाख रुपये काढायचे असल्याचे सांगून वकिलाने फिर्यादीकडून धनादेश आणि बँक विड्रॉल स्लिपवर सह्या घेतल्या. मात्र, प्रत्यक्षात फिर्यादीच्या खात्यातून १० लाख रुपये स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर हस्तांतरित केले. वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर ३० जुलै २०१९ रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी पार पडली. सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. बँक अधिकाऱ्याची साक्ष आणि प्रमाणित बँक अभिलेखांमधून १० लाख रुपये हस्तांतरित झाल्याचा आर्थिक व्यवहार न्यायालयात स्पष्टपणे सिद्ध झाला. फिर्यादीने केवळ एक लाख रुपये काढण्यास संमती दिली होती, मात्र वकिलाने गैरफायदा घेऊन दहा लाख रुपये लाटल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले. वकिलाने नुकसानभरपाईच्या ५० टक्के रकमेवर व्यावसायिक फीचा अधिकार असल्याचा बचाव घेतला, मात्र तसा कोणताही लेखी करार ते न्यायालयात सादर करू शकले नाहीत.
दरम्यान, तपासात मूळ धनादेश जप्त न करणे, हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल नसणे यांसारख्या त्रुटींमुळे बनावट दस्तऐवजांशी संबंधित कलम ४०६, ४६५, ४६८ आणि ४७१ अंतर्गत आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. मात्र, कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा संशयापलीकडे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणात फिर्यादी बाळासाहेब रणसिंग यांचे मार्च २०२६ मध्ये निधन झाले. त्यामुळे न्यायाचा अंतिम निकाल पाहण्यासाठी ते हयात नव्हते. तरीही त्यांनी दिलेली साक्ष आणि पोलिसांनी गोळा केलेले पुरावे यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना न्याय मिळाला.
न्यायालयाने वकिलाला एक वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी तीन महिने साधी कैद भोगावी लागेल. तसेच, दंडाच्या रकमेपैकी २० हजार रुपये फिर्यादीच्या कायदेशीर वारसांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या खटल्यात महिला पोलीस शिपाई सगुणा आवटे यांनी साक्षीदारांचा पाठपुरावा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर सरकारी वकील ए. ए. रणसिंग, राहुल सोनवणे आणि होळकुंदे यांनी शासनाची बाजू भक्कमपणे मांडली. तपास अधिकारी म्हणून पद्मराव गंपले यांनी कामकाज पाहिले होते. या निकालामुळे नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा