बारामती : पुणे जिल्ह्यातील खेड आणि ठाणे शहर हद्दीत घडलेल्या तब्बल तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) आणि खेड पोलिसांना मोठे यश आले आहे. तब्बल ११४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मागोवा घेत आणि उसाच्या शेतातून थरारक पाठलाग करत पोलिसांनी ३५ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला आणि त्याच्या साथीदाराला जेरबंद केले आहे. या कारवाईत दोन गावठी पिस्तूल आणि काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.
याप्रकरणी ललित दिपक खोल्लम (वय ३८, रा. शिरोली, ता. खेड), नंदलाल दिलीप होले (वय ३१, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) आणि त्यांना गुन्ह्यासाठी रसद पुरवणारा निलेश कैलास सणस (वय ३४, रा. कारेगाव) या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दिनांक १८ मार्च २०२६ रोजी खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे धनंजय मारुती घेवडे (वय ३३) या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर हत्याराने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, मुख्य रस्त्यावरील फुटेज तपासले असता सराईत गुन्हेगार ललित खोल्लम आणि नंदलाल होले हे त्या परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना दिसले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांच्या मागावर राहून खेड ते वडगाव निंबाळकर असा तब्बल ४५ किलोमीटरचा प्रवास करत सलग ६ दिवस ११० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. हे आरोपी वडगाव निंबाळकर परिसरात असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी उसाच्या शेताला घेराव घातला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी नदीच्या दिशेने पळ काढला, मात्र पोलिसांनी अतिशय वेगाने पाठलाग करून त्यांनी नदीत उडी मारण्यापूर्वीच शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.

आरोपींच्या चौकशीतून उघड झालेले ३ खून
१. धनंजय घेवडे हत्या प्रकरण: गावातील पूर्ववैमनस्यातून आरोपींनी धनंजय घेवडे याला लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून मारले व पुरावे नष्ट करण्यासाठी कपडे जाळून मोबाईल विहिरीत फेकून दिला. (खेड पोलीस ठाणे)
२. श्रीकांत वाडेकर हत्या प्रकरण: आरोपी ललित खोल्लम याचे रूपाली वाडेकर हिच्याशी प्रेमसंबंध होते. पैशांच्या वादातून त्याने रूपालीचा मुलगा श्रीकांत (वय २६) याचे ठाण्यातून अपहरण केले. शिरोली येथील फ्लॅटवर रॉडने मारून त्याचा खून केला व मृतदेह मंचर येथे जाळून त्याची राख घोडनदीत फेकून दिली. (महात्मा फुले चौक, ठाणे शहर)
३. रूपाली वाडेकर हत्या प्रकरण: आपल्या मुलाबाबत वारंवार विचारणा करणाऱ्या रूपाली वाडेकर (वय ४६) हिला ललितने १३ नोव्हेंबर २०२५ रोजी शिरोलीत बोलावून घेतले आणि रॉड व चाकूने वार करून तिचीही निर्घृण हत्या केली. (खेड पोलीस ठाणे)

मोक्कातील आरोपी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी
मुख्य आरोपी ललित खोल्लम याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे तब्बल ३५ गुन्हे सातारा, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर आयुक्तालयात दाखल आहेत. तर नंदलाल होले याच्यावरही दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. या दोघांवर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई झाली असून ते सध्या जामिनावर बाहेर होते. फरार काळात ललितने मध्यप्रदेशातून आणलेली २ गावठी पिस्तुलं आणि ४ काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
सदरची उत्कृष्ट कामगिरी आणि तपास खालील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली:
मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी
* श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)
* श्री. रमेश चोपडे (अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग)
* श्री. गणेश बिरादार (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग)
* श्री. अमोल मांडवे (उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड उपविभाग)
* श्री. सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग)
* श्री. बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग)
सहभागी पोलीस ठाणे व तपास पथक
स्थानिक गुन्हे शाखा (LCB): पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सपोनि महादेव शेलार, सपोनि कुलदीप संकपाळ, पोसई अभिजीत सावंत, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, श्रेणी पोसई विनोद भोकरे.
पोलीस अंमलदार: दिपक साबळे, संदिप वारे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, अक्षय नवले, राजू मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, भाऊसाहेब पुंड, अजय देडे, बाळासाहेब खडके, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले, राहूल पवार, रणजित कोंडके.
खेड पोलीस स्टेशन: पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोसई श्रीकांत गोडगे, पोसई महेश गरड, श्रेणी पोसई शंकर भवारी.
पोलीस अंमलदार: जिजाबापू बिडकर, सुदर्शन माताडे, महेश गोसावी, स्वप्निल लोहार, गोकुळ कोळी, संकेत कवडे, प्रविण आढारी, ऋषीकेश गोपतवाड, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली कांबळे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन: सपोनि नागनाथ पाटील.
पोलीस अंमलदार: पोपट नाळे, हृदयनाथ देवकर.
महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन (ठाणे शहर) (गुन्हा वर्ग करण्यात आलेले पोलीस ठाणे).
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा