बारामती : शहरात एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे, त्याच एका पोलीस हवालदाराने चक्क एका महिला वकिलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केले आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात या हवालदाराविरुद्ध अत्यंत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

रमेश मोहन जाधव असे या आरोपी पोलिसाचे नाव असून, तो पुणे येथील खडकी भागात कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने या महाभागाची ओळख एका महिला वकिलाशी झाली. आपली पहिली पत्नी अनेक वर्षांपासून विभक्त राहत असल्याची खोटी कहाणी सांगून त्याने या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. ‘तूच माझी होणारी पत्नी आहेस, आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही’ अशा गोडगोड थापा मारून त्याने तिचा पूर्ण विश्वास संपादन केला.
डिसेंबर २०२४ मध्ये पैशांची अडचण असल्याचे सांगून त्याने या महिलेकडून चाळीस हजार रुपये उकळले. त्याच दिवशी तिला बारामती येथील एका लॉजवर नेऊन लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केले. त्यानंतर एका मंदिरात तिच्या गळ्यात साखळी घालून तीच आपली पत्नी असल्याचे भासवले आणि काही काळ तिच्यासोबत संसारही थाटला.
या सहजीवनातून पीडित महिला गर्भवती राहिली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र, मुलीचा जन्म होताच या रक्षक म्हणवणाऱ्या पोलिसाचा खरा भक्षक चेहरा समोर आला. त्याने अचानक पत्नी आणि मुलीला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. गरोदरपणात तिला वाऱ्यावर सोडलेच, पण नंतरही कोणतीही जबाबदारी घेतली नाही. उकळलेले पैसेही परत केले नाहीत. जेव्हा तिने जाब विचारला, तेव्हा त्याने तिला अश्लील शिवीगाळ करत तक्रार मागे घेण्यासाठी धमकावण्यास सुरुवात केली.
अखेर या सततच्या मानसिक त्रासाला आणि फसवणुकीला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार कथन केला. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ रमेश जाधव याच्याविरुद्ध फसवणूक आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस कॉल रेकॉर्डिंग, लॉजचे रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि बँक खात्यांची कसून चौकशी करत आहेत. न्याय मिळवून देणाऱ्या वकिलालाच असा भयानक अनुभव आल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा