गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
दहीहंडीत नियम धाब्यावर बसवून डीजेचा दणदणाट; माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई, चौघांवर गुन्हा तर दोन वाहने जप्त

0
8
7
7
7
9
बारामती: दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करत विनापरवाना डीजे वाजवणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या चौघांविरुद्ध माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन वाहने जप्त केली असून, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहीहंडी उत्सवा दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना केल्या होत्या. तसेच, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करण्याबाबत सर्वांना लेखी नोटिसाही दिल्या होत्या. मात्र, ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजता माळेगाव (ता. बारामती) येथील पिरदर्गा मैदानावर काही लोकांनी दहीहंडी संघासोबत एकत्र येत विनापरवाना डीजे लावला. यावेळी चिथावणीखोर गाणी वाजवून एकमेकांना खुन्नस देत सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात आला.
जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या नोटिशीला केराची टोपली दाखवल्याचे निदर्शनास येताच माळेगाव पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई केली. या प्रकरणी केशव गुलाब भोसले, जयपाल भालचंद्र भोसले, रमेश भाऊसो गव्हाणे (सर्व रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) आणि परशुराम केरू गडदे (रा. चौफुला, ता. दौंड) यांच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात (गुन्हा रजि. नं. २३१/२०२६) भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७०, २९२ आणि मोटार वाहन अधिनियम कलम ५२/१८२ व ३९/१९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली एम.एच. १४ ए.झेड. ७२६९ आणि एम.एच. ०४ जी.आर. १७५६ ही दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, उपनिरीक्षक देविदास साळवे, संजय मोहिते आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सय्यद करत आहेत, तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हवालदार अवघड यांनी पार पाडली.
माळेगाव पोलिसांचे आवाहन
आगामी गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांच्या सूचनांचे आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. विनापरवाना डीजे, चिथावणीखोर गाणी आणि घोषणाबाजी करून शांतता भंग करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा माळेगाव पोलिसांनी दिला आहे.



