अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर प्रशालेत विविध उपक्रमांनी संविधान दिन उत्साहात साजरा

1
0
3
4
0
5
वडगाव निंबाळकर : येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर प्रशालेमध्ये २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिन अत्यंत उत्साहात आणि विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजामध्ये भारतीय संविधानाबद्दल जागृती निर्माण व्हावी आणि सर्वांना आपली मूलभूत कर्तव्ये, अधिकार व संवैधानिक मूल्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात २६ नोव्हेंबर २००८ रोजी शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुशीलकुमार अडागळे आणि प्रशालेचे प्राचार्य श्री. हेमंत तांबे यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
समाजामध्ये संविधानाची मूल्ये, कर्तव्ये आणि अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी प्रशालेच्या वतीने गावामधून जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.
या प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी संविधानविषयक विविध घोषणा देत संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाची सखोल माहिती मिळावी व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी प्रशालेत प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी प्राचार्य श्री. हेमंत तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानाचे महत्त्व विशद करताना त्यांनी संविधान म्हणजे नेमके काय, संविधानाने आपल्याला कोणते अधिकार दिले आहेत आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये कोणती आहेत, याची सविस्तर माहिती देऊन सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.




