गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
११२ वर आर्त हाक अन् काही मिनिटांतच पोलीस हजर! शिक्रापूर पोलिसांच्या वेगवान कारवाईने टळला अनर्थ

0
7
7
3
2
7
शिक्रापूर, दि.७ माझे वडील तलवार घेऊन आई आणि मला मारण्यासाठी धावत आहेत, असा डायल ११२ वर मदतीचा कॉल आल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संभाव्य दुर्घटना रोखली. पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून हातात तलवार आणि खिशात धारदार चाकू असलेल्या एका व्यक्तीला शिताफीने अटक केली.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलीस कॉन्स्टेबल सुनील शेंडगे हे डायल ११२ च्या ड्युटीवर असताना सकाळी १०.१६ वाजता साहिल खराबे याचा मदतीचा कॉल आला. माहिती मिळताच शेंडगे यांनी वरिष्ठांना कळवले आणि कॉन्स्टेबल साळवे यांच्यासह धानोरे (ता. शिरूर) येथे तातडीने धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की, बाबासाहेब नामदेव खराबे (वय ४३) हा आपल्या पत्नी आणि मुलाला शिवीगाळ व दमदाटी करत तलवारीने त्यांच्या अंगावर धावून जात होता. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशातून एक धारदार चाकूही मिळाला. त्याच्याकडून सुमारे ३० इंच लांबीची तलवार आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.




