आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
सस्तेवाडीत ग्रामपंचायतीचा ‘घाणेरडा’ कारभार! सांडपाणी थेट लोकवस्तीत, नागरिकांचे आरोग्य रामभरोसे
ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे आरोगसस्तेवाडी-स्मशानभूमी-नऊ फाटा रस्त्यावर घाणीचे साम्राज्य; सरपंच आणि ग्रामसेवकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, रोगराई पसरल्यास जबाबदार कोण?

0
7
0
6
5
2
बारामती : सस्तेवाडी (ता. बारामती) येथे ग्रामपंचायतीच्या अत्यंत भोंगळ, नियोजनशून्य आणि बेजबाबदार कारभारामुळे संपूर्ण गावाला आरोग्याच्या अत्यंत गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी ग्रामपंचायतीने थेट लोकवस्तीत गटारीचे पाणी सोडून दिल्याने नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण सस्तेवाडी गावातील सांडपाणी आणि शौचालयाचे पाणी वाहून नेण्यासाठी सस्तेवाडी ते स्मशानभूमी ते नऊ फाटा या मुख्य रहदारीच्या रस्त्यालगत काही वर्षांपूर्वी अंडरग्राउंड पाईपलाईन टाकण्यात आली होती. मात्र, हे पाणी गावाबाहेर योग्य ठिकाणी सोडण्याऐवजी, गावापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेल्या लोकवस्तीत आणून सोडून देण्यात आले आहे. स्मशानभूमीकडून गावाकडे येताना पहिलेच घर असलेले सुनील गणपत सस्ते आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांसमोरच हे दुर्गंधीयुक्त पाणी उघड्यावर सोडण्यात आले असल्याने संताप व्यक्त होत आहे.

पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या चारीमध्ये (पाटात) मोठ्या प्रमाणात गवत आणि कचरा साचला आहे. यामुळे सांडपाणी पुढे न वाहता त्याच चारीत तुंबून राहत आहे. परिणामी, या परिसरात भयंकर दुर्गंधी पसरली असून डासांचे आणि डासांपासून पसरणाऱ्या आजारांचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे.

या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल लावून चालावे लागत आहे. तसेच, लगतच शेती असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि मजुरांना या दुर्गंधीचा प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळी जेव्हा वारा शांत असतो, तेव्हा हा उग्र वास असह्य पातळीवर पोहोचतो.

पावसाळ्याच्या तोंडावर भयानक स्थिती
सध्या केवळ एक-दोन पाऊस झाले आहेत, मात्र आता पावसाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाण्याची चिन्हे आहेत. तुंबलेल्या चारीतून पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्र मिसळून थेट नागरिकांच्या घरांपुढे आणि अंगणात वाहून येण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाचे डोळेझाक आणि नागरिकांचा संतप्त सवाल
या गंभीर आणि आरोग्याशी खेळणाऱ्या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे, तसेच तोंडी तक्रारीही केल्या आहेत. मात्र, या सर्वांनी या प्रश्नाकडे सोयीस्करपणे पाठ फिरवली असून संपूर्णपणे डोळेझाक केली आहे. प्रशासनाच्या या बेफिकीरीमुळे स्थानिक नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.




