गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती: तरुणीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाची रवानगी थेट येरवडा कारागृहात!

0
5
4
4
2
6
बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणीचा रस्ता अडवून, तिला जबरदस्तीने घरी नेऊन मारहाण व लज्जास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपीची रवानगी आता थेट येरवडा केंद्रीय कारागृहात केली असून, बारामती पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेबाबत अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे.
दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास, बारामतीमधील देशमुख चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणी (नाव गोपनीय) आपल्या दुचाकीवरून जात असताना, ओंकार अशोक जाधव (रा. हरिकृपानगर, बारामती) याने तिचा रस्ता अडवला. आरोपीने बळजबरीने तिच्या गाडीची चावी हिसकावून घेतली आणि तिला तिच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या घरी नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, तिथे नेल्यानंतर आरोपीने पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिला बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या लज्जेस धक्का पोहोचवला.
या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला आणि आरोपी ओंकार जाधव याला अटक केली. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील अपहरण, मारहाण, विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर कलमान्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, पुढील सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी (MCR) मंजूर केली असून, त्याची रवानगी आता पुणे येथील येरवडा केंद्रीय कारागृहात करण्यात आली आहे.

“महिलांविरुद्धचा कोणताही गुन्हा खपवून घेतला जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी कोणत्याही छळाविरुद्ध त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.”
श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस निरीक्षक, बारामती शहर.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस हवालदार श्री. उदय टापरे यांनी केली आहे.






