अपघातअभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र
प्रलंबित वाहतूक दंड भरण्यासाठी ३० दिवसांची मुदत; अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार निलंबित!

0
5
5
5
3
3
पुणे (प्रतिनिधी): पुणे शहरातील ज्या वाहनधारकांवर वाहतूक नियमभंगाचे दंड (Challan) प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. प्रलंबित दंड वसुलीसाठी पोलिसांकडून वाहन मालकांना आता अधिकृत नोटीस पाठवण्यात येत असून, ही दंडाची रक्कम भरण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत दंड न भरल्यास कडक कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
जर वाहन मालकांनी निर्धारित ३० दिवसांच्या मुदतीत दंडाची रक्कम भरली नाही, तर:
संबंधित वाहन चालकाचा ड्रायव्हिंग परवाना (Driving License) निलंबित करण्याचा प्रस्ताव थेट प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे (RTO) पाठवण्यात येईल.
किंवा, संबंधित चलनाचा खटला थेट न्यायालयात दाखल करण्यात येईल.
वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर MHPECH-G या अधिकृत शॉर्ट कोडवरून SMS द्वारे ही नोटीस पाठवली जाणार आहे. नागरिकांनी नोंद घ्यावी की, ही नोटीस केवळ २६, २७, २८ फेब्रुवारी २०२६ आणि १ मार्च २०२६ याच कालावधीत पाठवली जाणार आहे. या तारखां व्यतिरिक्त वाहतूक पोलिसांच्या नावाने येणारा कोणताही मेसेज संशयास्पद समजावा.
फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी दंड भरण्यासाठी केवळ खालील अधिकृत मार्गांचाच वापर करावा:
१) अधिकृत वेबसाईट: https://mahatrafficechallan.gov.in
२) मोबाईल ॲप: Pune Traffic Police App (PTP App)
३) कार्यालयीन पेमेंट: जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयात जाऊन ई-चलन मशीनवर QR Code किंवा डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे.
सायबर फसवणुकीपासून सावधान (पोलिसांच्या महत्त्वाच्या सूचना)
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे:
श्री.हिम्मत जाधव, उपयुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा
दंड भरण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मोबाईलवर कोणतीही APK फाईल पाठवली जात नाही.
आपला OTP कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका.
केवळ नोटीसमध्ये नमूद केलेल्या अधिकृत पेमेंट पद्धतीचाच वापर करा.
संशयास्पद लिंक किंवा कॉल आल्यास त्यावर क्लिक न करता, त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
शहरात वाहतूक शिस्त लागावी आणि प्रलंबित दंड वसुली पारदर्शक पद्धतीने व्हावी हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पुणेकरांनी या उपक्रमास सहकार्य करून निश्चित मुदतीत आपला दंड भरावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.





