Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसोशल मिडिया

सावधान! बारामतीत ७४ वर्षीय वृद्धेला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ४५ लाखांचा गंडा; खाकी वर्दीतील सायबर भामट्याचा थरार

0 6 4 9 9 3

बारामती: सायबर गुन्हेगारांनी आता वृद्ध नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, बारामतीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला पोलीस अधिकारी भासवून एका ७४ वर्षीय वृद्ध महिलेला तब्बल १४ दिवस ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली दहशतीत ठेवत, तब्बल ४५ लाख ६० हजार रुपयांना लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील रहिवासी असलेल्या शकुंतला उद्धव खर्डे (वय ७४) यांना १४ फेब्रुवारी रोजी एका अनोळखी क्रमांकावरून WhatsApp व्हिडिओ कॉल आला. समोरची व्यक्ती पोलीस गणवेशात होती आणि तिने आपले नाव ‘संदीप पाटील’ असे सांगितले. “तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले असून तुम्हाला तातडीने अटक करावी लागेल,” अशी भीती या भामट्याने घातली.

आरोपीने केवळ फोनवर धमकी देऊन न थांबता, फिर्यादींना ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे भासवले. त्यांना सतत व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडून त्यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव निर्माण केला. वृद्धेची भीती ओळखून आरोपीने त्यांना त्यांच्या बँकेतील मुदत ठेव (FD) तोडण्यास भाग पाडले.

भयावह मानसिक दडपणाखाली असलेल्या शकुंतला खर्डे यांनी आरोपीच्या सांगण्यानुसार, दोन टप्प्यांत अनुक्रमे ३४ लाख ६० हजार आणि ११ लाख रुपये, अशी एकूण ४५ लाख ६० हजार रुपयांची रक्कम आरोपीने दिलेल्या बँक खात्यांवर वर्ग केली. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने संपर्क तोडला, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६(C) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या सायबर भामट्यांचा शोध घेत आहेत.

पोलीस प्रशासनाचे नागरिकांना कळकळीचे आवाहन

सायबर भामट्यांच्या वाढत्या जाळ्यापासून वाचण्यासाठी पोलिसांनी खालील सूचना दिल्या आहेत

 * डिजिटल अरेस्ट हा प्रकार अस्तित्वात नाही

 * कोणताही पोलीस अधिकारी किंवा सरकारी यंत्रणा व्हिडिओ कॉलवर कोणालाही अटक करू शकत नाही.

 * पैसे ट्रान्सफर करू नका: भीती दाखवून कोणी पैसे मागितल्यास तात्काळ सावध व्हा.

 * मदत घ्या: अशी घटना घडल्यास तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर फोन करा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा.

 * गोपनीयता पाळा: अनोळखी व्यक्तीला बँक तपशील, OTP किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

“सायबर फसवणूक झाल्यास पहिल्या काही तासांत तक्रार केल्यास तुमची रक्कम बँक खात्यात गोठवणे (Freeze) शक्य असते. त्यामुळे विलंब न करता पोलिसांशी संपर्क साधा.”

 प्रभारी अधिकारी,पोलीस निरीक्षक, श्रीशैल चिवडशेट्टी.बारामती शहर पोलीस स्टेशन बारामती शहर /पोलीस प्रशासन

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे