अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र
निरा-मोरगाव मार्गावर काळाचा घाला: ‘धोंडे जेवणासाठी’ मामाच्या गावी जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात करुण अंत
भरधाव ट्रकने दुचाकीला १५० फूट फरफटले; ९ वर्षीय चिमुकला मृत्यूशी देतोय झुंज

0
7
1
0
4
0
बारामती/वडगाव निंबाळकर:
निरा-मोरगाव राज्यमार्गावर चौधरवाडी फाट्याजवळ (ता. बारामती) शनिवारी सायंकाळी काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. मामाच्या गावी ‘धोंडे जेवणासाठी’ आनंदाने निघालेल्या भावंडांच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांचा ९ वर्षांचा लहान भाऊ जीवन-मरणाची झुंज देत आहे. क्षणार्धात घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७) आणि अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५, रा. बोडरेवस्ती, ता. फलटण) अशी या अपघातात प्राण गमावलेल्या दुर्दैवी बहिणींची नावे आहेत. तर, पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय ९) हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बारामती येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हे तिघेही इलेक्ट्रिक स्कूटीवरून मूर्टी (ता. बारामती) येथे आपल्या मामाकडे निघाले होते.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोरगावहून नीरेकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक: DD 1 G 9343) गुळुंचे गावाजवळ चौधरवाडी फाट्यावर या भावंडांच्या स्कूटीला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की स्कूटीचा अक्षरशः चुराडा झाला. धडकेनंतर ट्रकने स्कूटीला तब्बल १५० फूटांपर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे घटनास्थळ रक्ताने माखले गेले.
अपघातानंतर निर्दयी ट्रकचालक मुकेश मेघवाल याने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील संतप्त आणि जागरूक ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला काही अंतरावरच गाठले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.





