Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शासकीय नोकरीच्या आमिषाने तब्बल १ कोटी ३६ लाखांचा गंडा; बारामती पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आरोपी जेरबंद

0 6 9 2 8 4

बारामती : शासकीय नोकरीचे आमिष दाखवून आणि चक्क बनावट नियुक्तीपत्रे देऊन तरुण-तरुणींची तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी फरार असलेल्या एका मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, न्यायालयाने त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, सन २०२३ ते ४ मे २०२५ या कालावधीत तांदुळवाडी (ता. बारामती) येथील महिला हॉस्पिटल तसेच मळद परिसरात हा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार घडला. यातील मुख्य आरोपी अनिकेत धनंजय पाठक याने ‘गट-क अधिपरिचारिका’ (Staff Nurse) या पदावर शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी त्याने महिला हॉस्पिटलमधील स्टाफ नर्स व इतर नागरिकांशी जवळीक साधून त्यांचा विश्वास संपादन केला.
विश्वास दृढ करण्यासाठी आणि आपली फसवणूक लपवण्यासाठी आरोपींनी चक्क ‘बनावट नियुक्तीपत्रे’ (Fake Appointment Letters) तयार करून ती उमेदवारांना दिली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न मिळाल्याने आणि उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

आरोपी अनिकेत पाठक याने आपले साथीदार अजिंक्य पाठक, सिओना साळवे (उर्फ सिओना अनिकेत पाठक), सुधाकर सोळंकी, सागर गायकवाड आणि सुरज असदकर यांच्या मदतीने संगनमत करून हा गुन्हा केला. या टोळीने फिर्यादी व इतर साक्षीदारांकडून वेळोवेळी ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपये उकळले. या फसवणुकीप्रकरणी मार्च २०२६ मध्ये बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. याचदरम्यान, या गुन्ह्यातील एक आरोपी सुरज तिमय्या असदकर (वय ३९ वर्षे, व्यवसाय- डिलिव्हरी बॉय, रा. पडवळ अळी, गोखले हॉलजवळ, चिंचवड गाव, ता. हवेली, जि. पुणे) हा चिंचवडगाव येथील घरी आपल्या पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती बारामती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्याने आर्थिक फायद्यासाठी संगनमताने हा गुन्हा केल्याची स्पष्ट कबुली दिली आहे.
याच गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी अजिंक्य पाठक (रा. दौंड) आणि सुधाकर सोळंकी (रा. येरवडा) या दोन आरोपींना अटक केली आहे.


ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांच्यासह पोलीस अंमलदार सागर देशमाने, जितेंद्र शिंदे आणि विठ्ठल तरंगे यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने ही कामगिरी बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे