बारामती : बारामती तालुक्यातील तांदूळवाडी परिसरातील दादा पाटील नगर रेल्वे पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीने नुकत्याच जन्मलेल्या नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला उघड्यावर टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, स्थानिक दक्ष नागरिकांची समयसूचकता आणि बारामती तालुका पोलिसांच्या जलद हालचालींमुळे या चिमुरडीचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
१९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास शारदानगर येथील रहिवासी राधेश्याम चंद्रकांत जगताप हे सह्याद्रीनगर येथील गोठ्याकडे दूध आणण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना दादा पाटील नगर रेल्वे पुलाखाली नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी तातडीने जाऊन पाहिले असता तेथे एक नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. जगताप यांनी क्षणाचाही विलंब न लावता बाळाला सुरक्षितपणे कल्याणी कंपनीमागील गीर गाईच्या गोठ्याजवळ आणले आणि इतर नागरिकांच्या मदतीने त्याला ऊब देऊन प्राथमिक काळजी घेण्यास सुरुवात केली. याच दरम्यान स्थानिक नागरिक सागर शिलावंत यांनी डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डायल ११२ ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल शाहरूख शकील शेख आणि पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती हाताळत त्या नवजात बालिकेला सुरक्षितपणे ताब्यात घेतले व बारामती येथील शासकीय महिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली बाळावर उपचार सुरू असून सध्या तिची प्रकृती स्थिर आणि सुरक्षित आहे.
नवजात अर्भकाचा पूर्णपणे त्याग करण्याच्या हेतूने तिला उघड्यावर सोडून दिल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शाहरूख शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आई-वडील किंवा जबाबदार व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ९३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद महिला पोलीस हवालदार रचना काळे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार अमोल भोसले करत आहेत.
बाळाला अशा प्रकारे सोडून जाणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे तपास करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा