बारामती : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे नव्याने प्रस्तावित असलेल्या देशी दारूच्या दुकानाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय भगवान हिरवे, श्री. दत्तात्रेय रघुनाथ गायकवाड आणि ऋषिकेश गौतम जगताप यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी पुढाकार घेत राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल करून आपला विरोध नोंदवला आहे. गावात आधीच दारूची दुकाने असताना, रहिवासी आणि शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक दुकान नव्याने स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एका देशी दारूच्या दुकानाचा परवाना (सीएल-३) वडगाव निंबाळकर येथील प्रभाग क्र. २/५/६ हद्दीवर (वॉर्ड क्र. ५) मधील एका जागेत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. ही जागा बारामती-निरा या मुख्य आणि अत्यंत वर्दळीच्या रस्त्यालगत आहे. या प्रस्तावाविरुद्ध नागरिकांनी एकवटून कायदेशीर लढा सुरू केला आहे.
विरोध होण्याची प्रमुख कारणे
रहिवासी वस्तीला धोका: हे प्रस्तावित दुकान रहिवाशांच्या घरांघरांपासून अवघ्या ५ मीटर अंतरावर येणार आहे. यामुळे वस्तीत मद्यपींचा वावर वाढून नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि शांततेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
शैक्षणिक व धार्मिक स्थळांची जवळीक: या जागेपासून अवघ्या ३० ते १०० मीटर अंतरावर ‘स्वातंत्र्य विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय’, मारुती मंदिर आणि संत सावता महाराज मंदिर यांसारखी महत्त्वाची शैक्षणिक व धार्मिक स्थळे आहेत. या महाविद्यालयात परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. तसेच मंदिरात दररोज महिला व भाविकांची मोठी वर्दळ असते.
महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न: या मार्गावर रात्री उशिरापर्यंत महिला, विद्यार्थी आणि मजुरी करणारे नागरिक ये-जा करत असतात. दारूच्या दुकानामुळे मद्यपींकडून शिवीगाळ, जातीयवाचक अपशब्द आणि भांडणांचे प्रकार घडून महिला व मुलींच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, मुख्य रस्ता असल्याने येथे यापूर्वीही लहान मोठे अपघात झालेले आहेत.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय हिरवे व श्री. दत्तात्रेय गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच, ऋषिकेश जगताप यांनी इतर पुरुष व महिला ग्रामस्थांच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक (बारामती) यांच्या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून रीतसर जबाब नोंदवला आहे. कोणत्याही परिस्थितीत या परवान्याच्या स्थलांतराला परवानगी देऊ नये, अशी नम्र पण ठाम मागणी या अर्जांद्वारे करण्यात आली आहे.
वडगाव निंबाळकर ग्रामसभेने यापूर्वीच दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी गावात नव्याने कोणतेही मद्य विक्रीचे दुकान सुरू न करण्याचा ठराव पारित केला आहे. असे असतानाही हा नियम डावलून नव्याने स्थलांतराचा घाट घातला जात असल्याने ग्रामस्थांचे लक्ष प्रशासनाच्या निर्णयाकडे लागले आहे. जर लोकभावनेचा आदर न करता या दारू दुकानाला परवानगी दिली गेली, तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा