Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वडगाव निंबाळकर येथे नागपंचमीनिमित्त रंगला पारंपरिक खेळांचा जल्लोष; मुली व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

0 8 4 8 2 3

वडगाव निंबाळकर (बारामती): धावपळीच्या आणि मोबाईलच्या युगात लोप पावत चाललेल्या लोकसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करत, नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर बुधवार, २० ऑगस्ट रोजी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे महिला भगिनींसाठी भव्य पारंपरिक खेळांचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत वडगाव निंबाळकर च्या पुढाकाराने स्वातंत्र्य विद्यामंदिरच्या भव्य प्रांगणात या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांसाठी म्हणून असणाऱ्या आपल्या ​हक्काच्या एका दिवसासाठी आपल्या दैनंदिन घरकाम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून महिलांना मनसोक्त आनंद घेता यावा, यासाठी जिल्हा परिषद शाळा क्र. १ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. स्वप्निल शिंदे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची आखणी करण्यात आली. कार्यक्रमात पारंपरिक गाणी, फुगड्या, झिम्मा, फेर धरणे, लोकनृत्य आणि झाडाला बांधलेले पारंपरिक झोके अशा विविध जुन्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक जीवनशैलीत विस्मरणात गेलेल्या या खेळांनी महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद फुलवला.

​’माहेरचे अंगण’ ग्रुप बारामती यांचे उत्तम सादरीकरण’

बारामती येथील ‘माहेरचे अंगण’ सांस्कृतिक ग्रुपच्या अध्यक्षा सौ. शुभांगी महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक लोकगीते, भारुडे आणि नृत्यांनी कार्यक्रमात विशेष रंगत भरली. लोप पावत चाललेली संस्कृती आणि कलांची ओळख आजच्या तरुण पिढीला व शाळकरी मुलींना व्हावी, या दृष्टीने या सांस्कृतिक कार्यक्रमाने मोलाची भूमिका बजावली. स्वातंत्र्य विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी तसेच गावातील विविध वयोगटांतील महिलांनी मोठ्या उत्साहाने या सर्व खेळांमध्ये सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या सौ. रोहिणीताई कदम ढोले यांनी विशेष उपस्थिती दर्शवून महिला भगिनींना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य श्री. जितेंद्र पवार, प्रशासक (सरपंच) श्री. सुनील दत्तात्रय ढोले, उपसरपंच सौ. संगिता राजकुमार शहा, सर्व ग्रामपंचायत सदस्य, स्वातंत्र्य विद्यामंदिरच्या विद्यार्थीनी व शिक्षक वर्ग तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या शेवटी ‘माहेरचे अंगण’ ग्रुपच्या सर्व महिला कलाकारांचा मानाचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या आदरसत्कारामुळे ग्रुपमधील महिलांच्या चेहऱ्यावर एक सुखद आनंद आणि समाधानाची भावना पाहायला मिळाली. आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा स्वरूपाचे उपक्रम दरवर्षी राबवले जावेत, असा सूर उपस्थित महिलांमधून व्यक्त झाला. दुपारपासून सुरू असलेल्या या उत्साही वातावरणामुळे संपूर्ण गावात सणाचा एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे