गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची इंदापूर येथे मोठी कारवाई. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १२ गुन्हे उघडकीस.

1
0
1
6
0
3
बारामती : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने इंदापूर येथे मोठी कारवाई करत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १२ गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन मोटारसायकलींचा समावेश आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार (बारामती विभाग), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार (पुणे विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम (बारामती उपविभाग) आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक समांतर तपास करत होते.

दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज आणि त्यांचे पथक इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील संशयित इसम मोबाईल उर्फ हरी पवार, राहुल उर्फ चिल्या मंगेश काळे आणि महेश उर्फ मावड्या मंगेश काळे हे इंदापूर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे-सोलापूर बायपास रोडवरील जगदंब हॉटेलजवळ सापळा रचला.
काही वेळातच तीन जण मोटारसायकलींवरून तेथे आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे मोबाईल उर्फ हरी पवार (वय २२ वर्षे, रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर) आणि दुसरा एक विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलींबाबत विचारपूस केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता, या मोटारसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले.




