अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
बारामतीत टकारी समाजाकडून ‘विमुक्त दिन’ उत्साहात साजरा; भामटा सेटलमेंटच्या जागेसाठी कायदेशीर लढा सुरूच
बारामतीत टकारी समाजाचा संघर्षाचा निर्धार; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

0
8
6
6
0
3
बारामती : ब्रिटीश सरकारने १८७१ च्या गुन्हेगारी जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये जन्मजात गुन्हेगार ठरवून ज्या समाजाला तारेच्या कुंपणात बंदिस्त केले होते, त्या टकारी (भामटा) समाजाला भारत सरकारने ३१ ऑगस्ट १९५२ रोजी या जाचक कायद्यातून मुक्त केले. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून बारामतीतील ऐतिहासिक भामटा सेटलमेंटच्या जागेवर समस्त टकारी समाजाच्या वतीने ‘विमुक्त दिन’ (स्वातंत्र्य दिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रलंबित जागेच्या प्रश्नाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

भारतात एकूण ५२ सेटलमेंटची नोंद असून, त्यापैकी एक बारामतीतील भामटा सेटलमेंट आहे. टी. सी. कॉलेज रोड, प्रांत साहेब निवासस्थानासमोर, ८ नंबर शाळेमागे, मिशन ग्राऊंड येथे ही ऐतिहासिक जागा असून आजही त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. मात्र, बारामती तहसील विभागातून चुकीची नोंद लागल्याचे सांगून कागदपत्रांमध्ये खाडाखोड करत सातबारा उताऱ्यावरून या सेटलमेंटचे नाव जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्याचा आरोप समाजाने केला आहे. या अन्यायाविरुद्ध समस्त टकारी समाज कायदेशीर लढा देत असून तो यापुढेही तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या विमुक्त दिनाच्या कार्यक्रमात समाज बांधवांनी एकत्र येत भामटा सेटलमेंटच्या जागेवर पुष्पहार अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड, संतोष जाधव, बाळासाहेब (अनिल) गायकवाड, सुभाष आप्पा जाधव, शेखर गायकवाड, गणेश गायकवाड, संजय गायकवाड, विलास तात्या गायकवाड, प्रकाश गायकवाड, लक्ष्मण जाधव, अनिल जाधव, सागर गायकवाड, बाबूराव गायकवाड, रमेश जाधव, अशोक जाधव, हरी गायकवाड, नंदकुमार जाधव यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





