Breaking
अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

एकवेळ मुख्यमंत्री बदला, पण ‘हा’ अधिकारी बदलू नका!

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईने राज्यातील आणि बारामतीतील दूध-पाणी माफियांचे धाबे दणाणले!

0 7 1 6 4 3

पुणे/बारामती : तुकाराम मुंढे… हे नावच आता भ्रष्टाचाऱ्यांसाठी आणि माफिया प्रवृत्तींसाठी धडकी भरवणारे ठरत आहे. मे २०२६ मध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जी धडक कारवाई सुरू केली आहे, ती पाहून सामान्य जनतेतून एकच सूर उमटत आहे

“एकवेळ मुख्यमंत्री बदला, पण हा अधिकारी बदलू नका!”

महाराष्ट्राचा ‘सिंघम’ आणि कर्तव्यकठोर भूमिका

तुकाराम मुंढे यांची ही त्यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील तब्बल २५ वी बदली. पण बदलीच्या या खेळात त्यांची कर्तव्यनिष्ठा जराही डळमळीत झालेली नाही. प्रशासकीय सेवेत आपण कोणत्या गोष्टींसाठी आलो आहोत आणि कोणत्या कर्तव्याची शपथ घेतली आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

“लोकांच्या आरोग्याशी आणि जीवनाशी खेळून, भेसळ करून जर कोणी पैसा कमवत असेल, तर मला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून मी त्यांच्यावर कठोर कारवाई करणारच, हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे,” 

ही ठाम भूमिका घेऊन त्यांनी संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. त्यांच्या या तडफदार नेतृत्वामुळेच ते राज्याचे ‘सिंघम’ ठरत आहेत.

मुंढेंच्या नेतृत्वाखालील धडक कारवाईची आकडेवारी पाहिल्यास ५० हून अधिक ठिकाणी राज्यव्यापी धाडी टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये २७ आस्थापने थेट सील करण्यात आली असून ३३ आरोपींवर गुन्हे दाखल आणि कित्येकांविरूद्ध अटक कारवाई करण्यात आली आहे.

बनावट दूध, बनावट पनीर, गुटखा आणि अस्वच्छ अन्न उत्पादन युनिट्सवर निर्दयी प्रहार करण्यात आला आहे.

आज संपूर्ण राज्यभर ज्या वेगाने कारवाया होत आहेत, ते पाहता सामान्य जनतेच्या मनात एक अत्यंत ज्वलंत प्रश्न उभा राहिला आहे,

आत्तापर्यंत या पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांना या गोष्टी दिसत नव्हत्या का? 

की तुकाराम मुंढे आल्यावरच अचानक हे गुन्हे उघडकीस येत आहेत? इतकी वर्षे लोकांच्या जिवाशी खेळणारे हे रॅकेट राजरोसपणे सुरू असताना, मागील अधिकारी नक्की कोणत्या अयोग्य प्रकारे काम करत होते, यावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या सर्व कारवाईची बारामतीत मात्र खळबळ उडाली आहे.

दूध माफियांचे धाबे दणाणले!

या कारवाईचा सर्वात मोठा आणि थेट दणका बारामती तालुक्यातील दूध माफियांना बसला आहे. मुंढेंच्या नावाने बारामतीत अक्षरशः खळबळ आणि दहशत निर्माण झाली आहे. गावपातळीवरील २०० ते ५०० लिटर दूध संकलन करणाऱ्या केंद्रांपासून ते ५० ते ७० हजार लिटर संकलन करणाऱ्या मोठ्या दूध संघांपर्यंत सर्वांचेच संकलन अचानक घटले आहे.

अचानक संकलन कमी होण्याचा अर्थ स्पष्ट आहे— जे बनावट दूध रोज बाजारात ओतले जात होते, ते मुंढेंच्या भीतीने बंद झाले आहे. दूध संकलन करणाऱ्या डेअरीपासून ते प्रक्रिया करणाऱ्या संघांपर्यंत सर्वांचीच पाचावर धारण बसली आहे.

राज्याचा आणि दुधाचा प्रश्न तर ज्वलंत आहेच, पण बारामती तालुक्यात अजून एक भयंकर मायाजाल पसरले आहे, ते म्हणजे ‘आर ओ वॉटर फिल्टर’ (RO Water) माफियांचे. कोणतेही अधिकृत लॅब टेस्टिंग रिपोर्ट (Lab Testing Report) व परवाना न घेता, वर्षानुवर्षे अनधिकृत पाणी विकून हे माफिया लक्षाधीश झाले आहेत. 

“पैसे फेकले की अधिकारी मॅनेज होतो आणि आपले काळे धंदे सुरळीत चालतात,” अशी या माफियांची मस्ती आहे.

बारामतीचे तत्कालीन आमदार व दिवंगत उपमुख्यमंत्री यांनी अशा प्रवृत्तींचे आणि चुकीच्या कामांचे कधीही समर्थन केले नव्हते. मात्र, आज हेच पाणी आणि दूध माफिया आतापर्यंत कमवलेल्या काळ्या पैशाच्या जोरावर अधिकाऱ्यांना विकत घेण्याची स्वप्ने पाहत आहेत, ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे.

या मुजोर आणि जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या माफियांवर एफडीएचे आयुक्त आता कशी आणि कधी कारवाई करणार, याकडे संपूर्ण बारामतीचे आणि राज्याचे लक्ष लागून आहे.

मात्र ‘महाराष्ट्र पोलीस कारनामा’ MPK NEWS या अन्यायाविरुद्ध आणि माफियांच्या दहशतीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेणार आहे. भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आणि या माफियांची दहशत मोडून काढण्यासाठी आम्ही सातत्याने परखड बातम्या देत राहू.

मुंढेंसारख्या अधिकाऱ्याची या पदावरून बदली झाल्यास महाराष्ट्र अस्थिर होईल, कारण हा अधिकारी तळागाळातील जनतेच्या आरोग्याशी निगडित प्रश्नांवर कायदेशीर आणि योग्य भूमिका घेत आहे. म्हणूनच जनतेचा सरकारला थेट इशारा आहे— 

“एकवेळ मुख्यमंत्री बदला, पण हा अधिकारी बदलू नका!” 

इथून पुढे लोकांच्या जीवनाशी व आरोग्याशी निगडित असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर “महाराष्ट्र पोलीस कारनामा” MPK NEWS सातत्याने आवाज उठवणार आहे! 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे